Breaking News

कोरठण खंडोबाचा चैत्र पौर्णिमा उत्सवा निमित्त पालखीची मिरवणुक

पारनेर, दि. 20 - सालाबाद प्रमाणे श्री क्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थानचा चैत्र पौर्णिमा उत्सव शुक्रवार दि. 22 एप्रिल रोजी मोठ्या भक्तीभावाने संपन्न होणार आहे. श्री खंडोबा देवाची उत्सवमुर्तीची चांदीच्या पालखीतून मिरवणूक आणि कुलधर्म कुलाचार करण्यासाठी दिवसभर व रात्रभर भाविकांचे जागरण विधी, गोंधळ विधी  व  महाप्रसाद वाटप इ. कार्यक्रम या उत्सवातील मुख्य आकर्षण आहे. देवस्थानतर्फे दर्शन व्यवस्था, वाहने पार्किंग, पिण्याचे पाणी नियोजन आहे. 
कान्हुरपठार 16 गावे पाणी योजनेतून देवस्थानला पाणी उपलब्ध झाल्यामुळे सोय झाली आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न असल्याने भाविकांसाठी सोय करण्यात आली आहे.
चैत्र पौर्णिमेला सकाळी 6 वाजता श्री खंडोबा मंगलस्नान, अभिषेक पुजा होऊन सकाळी 8 वाजता महाआरती होईल. सकाळी 10 वाजता देवाची चांदीच्या पालखीतून प्रदक्षिणा मिरवणूक निघेल. दुपारी 12 वाजल्यापासून पौर्णिमेचा महाप्रसाद वाटप करण्यात येणार आहे. कै. भाऊ बजाबा सुंबरे स्मरणार्थ श्री. गोपीनाथ सुंबरे, कै. काशिनाथ बजाबा सुंबरे स्मरणार्थ बाळकृष्ण सुंबरे आणि पंढरीनाथ दशरथ घुले पिंपळगाव रोठा यांचे महाप्रसाद वाटपाचे नियोजन आहे.
तसेच येणार्‍या भाविकांसाठी दिवसभर नविन सभामंडपात भाविकांच्या जागरण विधी व गोंधळ विधीचे कार्यक्रम चालू राहून कोरठण गड दुमदुमत राहिल. रात्रौ 9 वा. पासून पहाट होईपर्यंत जागरण विधी व गोंधळ विधी कार्यक्रम करण्याचे नियोजन आहे. सर्व भाविकांनी महाप्रसाद व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे निवेदन देवस्थानतर्फे अध्यक्ष ड. पांडुरंग गायकवाड, उपाध्यक्ष रामदास मुळे, सचिव श्री. शांताराम खोसे, खजिनदार श्री. बन्सी ढोमे,सर्व विश्‍वस्त व ग्रामस्थ यांनी केले आहे.
या कार्यक्रमासाठी कोरठण खंडोबा (पारनेर) येथे महाराष्ट्राच्या काना कोपर्‍यातून भाविक येत असतात. त्यातच पाणीटंचाई असल्याने भाविकांच्या पिण्याची सोय करण्यात आली आहे.