Breaking News

‘आपलं घर’ योजना चौकशीच्या फेर्‍यात

मुख्यमंत्र्याचे चौकशीचे आदेश
तक्रारीत तथ्य आढळल्यास कारवाईचे आश्‍वासन 

पुणे, दि. 18 - पुण्यात फक्त 5 लाखांत 1 बीएचके घर देण्याचा दावा करणा़र्‍या ‘आपलं घर’ या योजनेच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असून, याबाबतचा अहवाल  सादर करावा, असा आदेशही त्यांनी दिला आहे. या योजनेबाबत करण्यात आलेल्या तक्रारीत तथ्य आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्याचे आश्‍वासन
ही मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिमेचा वापर करून मोठी जाहिरात करण्यात आली होती, मात्र पुण्यात आपलं घर या योजनेशी सरकारचा काहीही संबंध नसल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी दिली असून, 5 लाखांत आपलं घर या योजनेवर आक्षेप घेत भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी या योजनेद्वारे लाभार्थी इच्छुकांकडून विकासक पैसे उकळत असल्याचा आरोप केला होता. त्यासाठी विविध प्रलोभने आणि आश्‍वासने दिली जात असून, या योजनेची सखोल चौकशी करण्याची मागणी सोमय्या यांनी केली होती. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष घालण्याची विनंती करणारे पत्रही लिहिले होते, त्यांनर मुख्यमंत्र्यांनी वरील आदेश दिले. दरम्यान, पुण्यात गेल्या काही दिवसांपासून शहराच्या सभोवताली 5 लाखांत घर देण्याची योजना सुरू केल्याची जाहिरात प्रसारमाध्यमांत प्रसिद्ध झाली आहे. या योजनेला सर्वसामान्यांचा भरघोस प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत 10 हजार लोकांनी नोंदणी केली आहे. पंतप्रधान आवास योजनेंतर्गत ही योजना असल्याचे विकासकाने सांगितले आहे. या योजनेत अर्जदाराकडून 1 हजार 145 रूपये अनामत रक्कम परत न देण्याच्या अटीवर घेण्यात येत आहे.
अनामत रक्कम भरलेल्या सर्वांना घर मिळणार नसून सोडत पद्धतीने घरे मिळणार आहेत. तसेच जे लोक पंतप्रधान आवास योजनेसाठी पात्र ठरणार नाहीत त्यांना 7 लाख 50 हजारात घर मिळणार आहे. या ठिकाणी घरे बांधून देण्याचा दावा केला आहे, तिथे कसलेही बांधकाम झालेले नाही. शिवाय, पुण्यात जमिनीचे दर गगनाला भिडलेले असताना एवढया कमी किंमतीत घर कसे देणार, असा सवालही विचारला जात आहे. त्यामुळे, एकुणच या योजनेवर संशय व्यक्त केला जात आहे.