कुडाळमध्ये पुन्हा नारायण राणेंचे वर्चस्व
नगरपंचायतीमध्ये काँग्रेसकडे सत्ता
सिंधुदुर्ग, दि. 18 - नव्याने अस्त्विात आलेल्या कु़डाळ नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेसने बाजी मारत, नारायण राणेंनी आपले वर्चस्व पुन्हा सिध्द केले आहे. एकूण 17 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने सर्वाधिक नऊ जागांवर विजय मिळवला. शिवसेनेने सहा, भाजपने एक आणि अपक्षाने एका जागेवर विजय मिळवला. नगरपंचयातीची निवडणूक असली तरी, इथे काँग्रेस नेतेनारायण राणे आणि शिवसेना असा थेट सामना होता. नारायण राणे, शिवसेना आणि भाजपने इथे पूर्ण ताकत पणाला लावली होती.
मागील विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या वैभव नाईक यांनी नारायण राणेंचा पराभव केला होता. त्यावेळी कुडाळ शहरामध्ये वैभव नाईक यांना चांगली आघाडी मिळाली होती. त्यामुळे पहिल्यांदाच होत असलेल्या नगरपंचायत निवडणुकीत काय होणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. अखेर मतदारांनी पुन्हा एकदा नारायण राणे यांच्याच बाजूने कौल दिला असून, काँग्रेसकडे सत्तेच्या चाव्या दिल्या आहेत. शिवसेनेचे स्थानिक आमदार वैभव नाईक इथे निवडणुकीची जबाबदारी संभाळत होते. भाजपचे डोंबिवलीतील आमदार रविंद्र चव्हाण इथे तळ ठोकून होते. मात्र निकालावरुन त्याचा काहीही परिणाम झाला नसल्याचे दिसत आहे. या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी केली होती. काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेसला लढण्यासाठी केवळ दोनच जागा दिल्या होत्या. त्या दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पराभूत झाले आहेत. शिवसेना आणि भाजपने स्वबळावर ही निवडणूक लढविली होती.या नगर पंचायतीच्या 17 जागांसाठी 77 उमेदवार रिंगणात होते. कुडाळ नगर पंचायतीसाठी 73.63 टक्के मतदान झाले होते.
