Breaking News

रॉबिन उथप्पाचे अर्धशतक, कोलकात्याचा विजय

मोहाली, दि. 20 - गोलंदाजांनी केलेल्या टिच्चून मार्‍यानंतर सलामीवीर रॉबिन उथप्पाने केलेल्या आक्रमक अर्धशतकाच्या जोरावर बलाढ्य कोलकाता नाइट रायडर्सने आयपीएलमध्ये आपला तिसरा विजय नोंदवताना किंग्ज इलेव्हन पंजाबला 6 विकेटनी नमविले. पंजाबच्या 138 धावांचा पाठलाग करताना कोलकात्याने 17.1 षटकांत 4 बाद 141 धावा केल्या.
आय. एस. बिंद्रा स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकून कोलकात्याने यजमान पंजाबला प्रथम फलंदाजीला निमंत्रित केले. गोलंदाजांनी पंजाबला रोखल्यानंतर उथप्पाने जबरदस्त फटकेबाजी करताना संघाला विजयी केले. उथप्पा आणि कर्णधार गौतम गंभीर यांनी सावध सुरुवात करताना खेळपट्टीचा अंदाज घेतला. एका बाजूने उथप्पाने फटकेबाजी करून कोलकात्याच्या धावसंख्येला वेग दिला. गंभीरनेही जास्तीत जास्त उथप्पाला स्ट्राइक देण्याचा प्रयत्न केला
. या दोघांनी 8.3 षटकांत 82 धावांची शानदार सलामी दिली.
उथप्पा अर्धशतक झळकवून लगेच बाद झाला. त्याने 28 चेंडूंत 9 चौकारांसह 53 धावा फटकावल्या. यानंतर गंभीरही 34 चेंडूंत 34 धावा काढून परतला. दोघेही झटपट बाद झाल्यानंतर कोलकात्याच्या धावसंख्येला खीळ बसली. मात्र, मनीष पांडे, सूर्यकुमार यादव व युसूफ पठाण यांनी संघाला विजय मिळवून दिला. पंजाबकडून अक्षर पटेल व प्रदीप साहू यांनी चांगला मारा करताना प्रत्येकी 2 बळी घेतले.
तत्पूर्वी, अडखळत्या सुरुवातीनंतर आक्रमक फलंदाज शॉन मार्शने झळकावलेल्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर पंजाबने निर्धारित षटकांत 8 बाद 138 धावांची मजल मारली. मार्शने 41 चेंडूंत 5 चौकार व एका षटकारासह 56 धावा केल्या. तर, मुरली विजयने 22 चेंडूंत 26 धावा काढल्या. या दोघांव्यतिरिक्त इतर कोणताही फलंदाज चमक दाखवू शकला नाही. गोलंदाजीत मॉर्नी मॉर्केल (2/27) व सुनील नरेन (2/27) यांनी अचूक मारा करून पंजाबला रोखले.