Breaking News

पनामा पेपर्स प्रकरण संचालक मंडळाच्या बैठकीत अमिताभ सहभागी

नवी दिल्ली, दि. 21 - अभिनेते अमिताभ बच्चन हे 1993 ते 1997 या कालावधीत किमान चार विदेशी शिंपिंग कंपन्यांच्या संचालक पदावर होते अशी माहिती समोर आली आहे. फोन कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून दोन कंपन्यांच्या संचालक मंडळांच्या बैठकीतही ते सहभागी झाले होते, असे पुरावे देखील समोर आल्यामुळे खळबळ उडाली आहे. 

पनामा पेपर्सप्रकरणामुळेच अमिताभ बच्चन यांना ‘अतुल्य भारत’चे ब्रँड अ‍ॅम्बेसिडर बनविण्याचा निर्णय केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्रालयाने लांबणीवर टाकला आहे.
पनामा पेपर्समध्ये नमूद केल्याप्रमाणे आपला कोणत्याही परदेशी कंपनीशी संबंध नाही, असा दावा करणार्‍या अमिताभ यांच्याविरोधात पुरावे समोर आले असून, पनामातील मोझॅक फॉन्सेका या कायदा कंपनीच्या कागदपत्रांनुसार अमिताभ बच्चन हे 1993 ते 1997 या कालावधीत चार परदेशी कंपन्यांचे संचालक होते. तसेच अमिताभ यांनी ते संचालक असलेल्या परदेशी कंपन्यांच्या संचालक मंडळाच्या बैठकीत कॉन्फरसिंगद्वारे सहभाग घेतला होता. ट्रॅम्प शिपिंग लिमिटेड आणि सी बल्क शिपिंग कंपनी लिमिटेडच्या ( ब्रिटीश व्हर्जिन आइसलँड) संचालक मंडळाची ही बैठक 12 डिसेंबर 1994 रोजी झाली होती. याशिवाय, या दोन्ही कंपन्यांकडून जारी करण्यात आलेल्या इन्कम्बसी सर्टिफिकेटमध्येही अमिताभ यांच्या नावाचा उल्लेख आहे.
जेधा येथील एका गुंतवणुक कंपनीकडून कर्ज घेण्यासंदर्भातील या कागदपत्रांचा उल्लेक मोझॅक फॉन्सेकाच्या नोंदीत आढळून आला होता. त्यामुळे आता अमिताभ बच्चन यांच्यासमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे. पनामा पेपर्स प्रकरणात पुढे आलेल्या तब्बल 500 भारतीयांची नावे पुढे आल्याने केंद्रीय अर्थ मंत्रालयाने याप्रकरणी चौकशी समिती नियुक्त केली आहे.