Breaking News

शंकराचार्यांचे डोके ताळ्यावर आहे का?

हिंदू धर्माचे अस्तित्व शोधायचे म्हटले तर भारतातच चाचपडावे लागेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. भारताचे पलिकडे हिंदूत्व औषधालाही सापडत नाही.  भारतात देखील धर्म म्हणून हिंदूंची परिस्थिती अगदीच केविलवाणी आहे. खरे हिंदू धर्म वाढावा, प्रसार व्हावा म्हणून दुरदृष्टीने आद्य शंकराचार्यांनी चार दिशांना चार धर्म   शक्तीपिठांची स्थापना केली या पिठांमधून हिंदू धर्माचे उत्थान व्हावे एव्हढीच माफक अपेक्षा आद्य शंकराचार्यांनी बाळगली होती. आद्य शंकराचार्यांचा वारसा चालविणारे  द्वारका पिठाचे शंकराचार्या स्वरूपानंद सरस्वती हे त्यापैकीच एक. खरे तर आद्य शंकराचार्यांनी सोपविलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडून धर्म वाढविणे हे त्यांचे खरे  काम. पण अलिकडच्या काळात एखाद्या माथेफिरूने हाती घ्यावे असे काम या शंकराचार्यांनी हाती घेतल्याचे दिसत आहे. डोके फिरल्यागत त्यांचे वक्तव्य हिंदू धर्माच्या  मुळावरच घाव घालण्यास कारणीभूत ठरू पहात आहे. महाराष्ट्रातील नगर जिल्ह्यातील शिर्डीसारख्या छोट्याशा गावी साईबाबांचे देवस्थान आहे. परंतु या देवस्थानची  ख्याती इलेक्ट्रोमिडिया व प्रिंट मिडियामध्ये संपूर्ण जदगात पसरली आहे. साईबाबांच्या भक्तगणांत समाजातील सर्वस्तरांतील भक्तांचा समावेश आहे. ही वस्तुस्थिती  असतांना स्वतःला संकराचार्य म्हणविणारे स्वरूपानंद सरस्वती हे अतिशय खालच्या पातळीला जाऊन पत्रकार परिषदेत जाहीर करतात की, साईबाबा हा मुस्लिम धर्मिय  होता. त्याची आई वेश्याव्यवसाय करत होती. महाराष्ट्रातील लोक साईबाबांची पूजा करतात. म्हणून महाराष्ट्रात दुष्काळ पडला आहे. ज्या स्त्रिया शनीशिंगणापूरच्या  शनीची पुजा करतील त्यांच्यावर बलात्कार होण्याची शक्यता जास्त आहे. यासारखी बालीश कोणतेही आधार नसलेले विधाने जेव्हा वारंवार शंकराचार्य करतात तेव्हा  शंकराचार्य मनोरूग्ण आहेत काय? असा प्रश्‍न हिंदू धर्मियांच्या मनात सहजपणे येतो. शिर्डीत साईबाबांचे प्रगटीकरण झाल्यानंतर त्यांच्या हयातीत त्यांनी कधीही मी देव  नाही, माजी पुजा करा यांसारखे विधाने केले नाहीत किंवा चमत्कार करतो, नमस्कार करा यांसारखीही त्यांची वर्तणूक नव्हती. साईबाबांच्या हयातीत मुठभर भक्तगण  होते. परंतु, आज त्यांच्या समाधीस्थळावर दर्शन घेणारे कोट्यवधी भाविक आहेत. या देवस्थानला जगमान्यता मिळाल्याने साईबाबांच्या झोळीत कोट्यवधी रूपयांची  परकीय देणगी पडत असते. विशेष म्हणजे दान करणार्‍यांची नावे बहुदा गुप्त असते. याउलट स्वरूपानंद सरस्वती यांचे भक्त नेमके किती आहेत हे त्यांचे त्यांनाही माहित  नाहीत. त्यांचा मठ चालविण्याकरीता जे लोक देणगी देतात ते त्या देणगीचा उपयोग आयकर सवलत मिळावी एवढ्यापुरताच करतात. शंकराचार्य नाशिक येथे सिंहस्थात  देखील असाच अतिरेकपणा करून गेले. पोलीस यंत्रणा व प्रशासकीय यंत्रणा यांना गाफील ठेवून सिंहस्थातील आखाडे, साधू महंतांचे नियम तोडून त्यांनी पहाटे तीन  वाजेला कुशावर्तात स्नान करण्याचा आग्रह केला. यासर्व कृत्याला त्यांचे भक्त देखील कंटाळले असावेत. साईबाबांचे समाधीस्थळ याबाबतचा वाद शंकराचार्य  यांच्याव्यतिरिक्त कोणीही करीत नाहीत. शंकराचार्यांचे जन्मस्थान मध्यप्रदेशातील सिवाणी जिल्ह्यातील दिघोरी येथील आहे. त्यांचे मुळ नाव पोथीराम उपाध्ये आहे.  त्यांनी 9 व्या वर्षी सन्यास घेतला ही वस्तुस्थिती आहे. परंतु असे म्हणतात की, साठी बुध्दी नाठी. शंकराचार्यांच्या वयाची साठी पुर्ण झालेली आहे आणि आयुष्यात  आपल्या मरणानंतर जग नाव घेईल असे कोणतेही जनकल्याणाचे सत्कृत्य त्यांच्याकडून घडल्याचे ऐकिवात नाही. त्यामुळे कदाचित मानवी स्वभावानुसार साईबाबांबद्दल  त्यांना जलसी असावी. म्हणूनच त्यांनी त्यांच्या भक्तांना साईबाबांच्या मुर्त्या उखडून फेकून देण्यास सांगितल्या. त्यांची पूजा करू नका असा आदेश दिला. तरी  साईभक्तांचा ओघ कमी झालेला नाही. साईबाबांवर टिका करून लोक आपली दखल घेत नाहीत, हे लक्षात येताच त्यांनी शनिशिंगणापूरच्या शनिचा आधार घेऊन ज्या  स्त्रिया शनिची पुजा करती त्यांच्याबद्दल अपशब्द काढले. आज शंकराचार्य साईबाबांवर घसरले आहेत. भविष्यकाळात त्यांना कोणी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष फूस लावल्यास ते  जगमान्य महामानव, राष्ट्रपुरूषांवरही घसरू शकतात. आज प्रसारमाध्यमांचा वेग प्रचंड आहे. त्यामुळे शंकराचार्यांच्या प्रत्येक वक्तव्यास प्रसिध्दी मिळते. काही अल्पजिवी  त्याप्रमाणे कृती देखील करतात. या सर्वांचा अंदाज घेता शंकराचार्यांना त्यांच्या पात्रतेच्या व्यक्तींकडून समजावणे आवश्यक आहे. शंकराचार्य जोपर्यंत जीवंत आहेत.  तोपर्यंत साईबाबांची व शनिदेवांची भक्ती करणार्‍यांची संख्या कमी होणार नाही. प्रत्येक वर्षी वाढणारी भक्तांची संख्या आणि देणग्यांचा कोट्यवधीचा आकडा यामुळे  शंकराचार्यांच्या छातीत धडकी भरू शकते. ते टाळण्याकरीता त्यांना आत्ताच समजावयाला हवे. शनिदेव दगडाचा देव आहे जे त्याची पूजा करतात त्यांना करू द्या.  साईबाबांच्या समाधीवर जे माथा टेकवतात तो त्यांच्या श्रध्देचा भाग आहे. शंकराचार्य तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या. हिंदू धर्म वाढविता आला नाही तर चालेल  पण तो संपवू नका. अशी सर्व खर्‍या हिंदूंची माफक अपेक्षा आहे.