Breaking News

ब्राम्हणी धर्म विरूद्ध भक्ती चळवळ

भारताच्या ज्ञात पाच हजार वर्षाच्या इतिहासात आपण डोकावून पाहिले तर एक गोष्ट सातत्याने दिसते, ती म्हणजे, ब्राम्हणेतर समुदायाचे शोषण. अर्थात कोणत्याही
शोषणाचा मुख्य हेतु आर्थिक लुबाडणूक हा असतो असे मानले जातेे. पंरतु ब्राम्हणी धर्माने सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि आर्थिक अशा सर्व प्रकारचे शोषण  करून  आजच्या हिंदू बहुजन जातींना मानसिक गुलाम करून ठेवले. ही मानसिक गुलामी संस्कृतीच्या नावाखाली इतकी बेमालूमपणे केली जाते की त्या जखडलेल्या  समुहालाही त्याचे आत्मभान राहिलेले नाही. पंरतु याचा अर्थ असा नव्हे की, इतिहासात याचे भान या समाजाला नव्हते. याउलट भारतात बौध्द आणि जैन धर्म यांनी  अध्यात्मिक मुक्तीचा मार्ग दाखवल्यामुळे या धर्मात ब्राम्हणेतरांनी प्रवेश केला. त्यातही बौध्द धर्म हा जनतेला अधिक भावला. तो त्यातील ‘निर्वाण’ प्राप्तीमुळे. ब्राम्हणी  धर्माने मोक्ष मिळवून देण्याची संकल्पना ही ब्राम्हणेतरांच्या आर्थिक लुटीसाठी वापरली. यातून कर्मकांड म्हणजे अमुक एक यज्ञ केल्यास अमुक पापातून मुक्ती असे, हे  गणित होते. पंरतु बौध्द धर्माने आणलेले ‘निर्वाण’ हे सामान्य जनतेला अनुभूती देणारे असल्यामुळे आणि समतेचा पुरस्कार केल्यामुळे ब्राम्हणी धर्माला या बौध्द व जैन  धर्माविरूद्ध षड्यंत्र करण्यात अधिक रस होता. सामान्य माणसाला व्यापार-व्यवसाय आणि कारागिर बनवून या धर्मांनी भारताची तत्कालीन अर्थव्यवस्था समृध्द करून  टाकली होती. आर्थिकदृष्टया स्वयंपूर्ण समाज आकाराला येत असतानाच ब्राम्हणी व्यवस्थेने व्यवसाय निहित बंदीस्त करून घेण्याची परंपरा आणली. पुरोहिताचा मक्ता  मिरवणार्‍या ब्राम्हणांनी सर्वप्रथम रोटी- बेटी बंदी व्यवहार आणला. तर दुसर्‍या बाजूला गावातील बलुतेदार आणि अलुतेदार समुहांनी निर्माण केलेली स्वतंत्र उत्पादन  व्यवस्था आणि त्यायोगे स्वतंत्र अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करण्याचे षडयंत्रही ब्राम्हणी धर्माने रचले. त्यामुळे बलुतेदार-अलुतेदार जातींनी उत्पादन केलेल्या वस्तू गावाच्या  वेशीबाहेर नेऊ नये अशी आज्ञा त्यांनी काढली. परिणामी ब्राम्हणेतर समाजाच्या आर्थिक उत्थानाची बाजारपेठ मोडीत निघाली. यानंतर गावात जो व्यक्ती ज्या व्यवसायात  आहे, त्याच व्यवसायाचा स्वीकार त्याच्या कुटुबांत जन्मलेल्या व्यक्तीला (पुरूषाला) स्वीकारावा लागेल. यातून व्यवसाय करणारा समुदाय जन्माने  व्यवसायात बंदिस्त  झाला. एकप्रकारे हा बंदिस्त वर्गच नंतर जात म्हणून उदयास आला. जातीव्यवस्था निर्माण करण्याचे हे टप्पे ब्राम्हणी धर्माने याप्रमाणे रचले. मग जातीत अनेक प्रतिभावंत  निर्माण होवूनही त्यांना प्रतिष्टा प्राप्त होवू शकली नाही. या विषमतेविरोधात देशात  संताची विद्रोही चळवळ उभी राहिली. या चळवळीने समतेचा विचार मांडला. शिवाय  प्रत्येक जातीतून आलेल्या संतानी ब्राम्हणी व्यवस्थेवर मार्मिक भाषेत प्रहार केले. अध्यात्मिक समतेची अनुभूती आपल्या अंतर्यामी स्वबळावर होणार्‍या हिंदू बहुजन  संतांचा ब्राम्हणी धर्माने छळ केल्याचा इतिहास  आपणास आजही वाचावयास मिळतो. मग या संतांचा निकष ब्राम्हणी व्यवस्थेने वेगवेगळया प्रकारे लावला. त्यामुळेच  आपणास संत शिरोमणी तुकाराम महाराज यांचे ‘पुष्पक‘ मधून वैकुठांला जाणे असो किंवा संत चोखामेळा ला ढिगार्‍याखाली गाडणे असो या सर्वात एकच साखळी  दिसते, ती म्हणजे अध्यात्मिक समतेचा पुरस्कार करणार्‍यांचा ‘निकाल‘ लावणे यात स्वामी चक्रधर आणि बसवेश्‍वर यांचीही सुुटका झाली नाही. ब्राह्मणी धर्माने असे  षड्यंत्र का रचले? असा प्रश्‍न सामान्य जनांणा निश्‍चित पडेल. याचे खरे कारण म्हणजे ब्राह्मणांनी धर्माला पावित्र्याचा, अंतःकरण शुद्धीचा आणि सम्यक आजीविकेचा  विषय बनविला नाही. त्यामुळेच आपणास असे दिसते की हेमाद्री या ब्राह्मणाने चातुवर्ण चिंतामणी हा ग्रंथ लिहून ब्राह्मणी कर्मकांड प्रशस्त करण्याचा कार्यक्रम चालवला.  यातून समाज व्यवस्था कर्मकांंडी बनवून माणसाचे जीवन म्हणजे लुट केला जाणार्‍या व्रतांचे कर्मकांड बनविले गेले.