Breaking News

वीजप्रश्‍नावर शेतकर्‍यांचे खानापूर येथे आंदोलन

। लाभक्षेत्रातील गावांमध्ये विजपूरवठा सुरळीत ठेवावा

शेवगाव, दि. 23 - जनावरांना व माणसांना पिण्यासाठी पाणी मिळावे, याकरिता जायकवाडी बॅकवॅटर लाभक्षेत्रातील गावांमध्ये वीज़पुरवठा सुरू ठेवावा, या मागणीसाठी खानापूर, घोटण, आंतरवली, कर्हेटाकळी, गदेवाडी रावतळे, कुरुडगावमधील शेतकर्‍यांनी बुधवारी सकाळी तीन तास खानापूर येथे रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे शेवगाव-पैठण राज्यमार्गावर दुतर्फा सुमारे पाच-सहा किलोमीटर अंतरावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
या भागातील सर्व शेतकरी जायकवाडीच्या पाण्यावर अवलंबून आहेत. मात्र, काही दिवसांपासून या परिसरातील वीज़पुरवठा महावितरणने तोडल्यामुळे शेतकर्‍यांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. सध्या दुष्काळी परिस्थितीमुळे बोअरचे पाणी आटले असून, विहिरींनीही तळ गाठला आहे. माणसांचे आणि जनावरांचे पिण्याच्या पाण्यावाचून हाल होत आहेत म्हणून तोडण्यात आलेला विद्युत पुरवठा पूर्ववत जोडण्यात यावा, या मागणीसाठी परिसरातील सात-आठ गावच्या शेतकर्‍यांनी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांसह एकत्र येत आजचे आंदोलन केले. तहसीलदार व महावितरणचे अधिकारी आल्याशिवाय आंदोलन मागे घेण्यात येणार नाही, अशी भूमिका आनदोलनकर्त्यांनी घेतली होती. महावितरणचे अधिकारी आले नाहीत, तहसीलदार दासाहेब गीते उशिरा तेथे आले. तहसीलदार आल्यानंतर आंदोलकांनी शासनाच्या निषेधार्थ घोषणा दिल्या. या विषयावर आपण जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करू व मार्ग काढू, असे आश्‍वासन तहसीलदारांनी दिले. दोन दिवसांत विद्युत पुरवठा सुरू झाला नाही तर कुठलीही पूर्वसूचना न देता शेवगाव येथे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी या वेळी दिला.
आंदोलनात संजय शिंदे, राम गोरे, मारुतराव थोरात, अशोक मोटकर, औरंगाबाद येथील अन्नदाता शेतकरी संघटनेचे जयाची सूर्यवंशी, सोपान ढोरकुले, संजय टाकळकर, बाळासाहेब मुंदडा, गोकुळ भागवत, नाना मोटकर, रावसाहेब लवांडे, गणेश पाडळे यांच्यासह शेतकरी सहभागी झाले होते.