Breaking News

गंगापूर धरणातून उपसला 5321 घ.मी. गाळ

नाशिक, दि. 21 - जलसंपदा विभागामार्फत गंगापूर धरणात सुरू करण्यात आलेल्या गाळ काढण्याच्या कामास शेतकर्‍यांचा चांगला प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत 626 ट्रक म्हणजेच 5321 घ.मी. गाळ काढण्यात आला आहे. पालकमंत्री गिरीष महाजन यांनी  यांत्रिकी विभागास आदेश देवून गाळ काढण्यासाठी 3 पोकलेन यंत्र उपलब्ध करून दिले आहेत.
गंगापूर धरणातील प्रकल्पीय उपयुक्त साठा 7200 दलघफु इतका आहे
. प्रकल्पाचे पाणलोट क्षेत्र 357.40 कि.मी. असून  या क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात गाळ वाहून जलाशयात साचला असल्याचे गाळ सर्वेक्षण अहवालावरून लक्षात आले. 2002 मध्ये महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्थेने डीजीपीएस तंत्राद्वारे गंगापूर प्रकल्पाचे सर्वेक्षण केले असता गाळामुळे प्रकल्पीय उपयुक्त साठा 5630 दलघफु इतका कमी झाल्याचे निदर्शनास आले.
धरणात असलेला गाळ शेतीसाठी उपयुक्त असल्याने प्रकल्पालगतच्या गंगावर्‍हे, गिरणारे, दुगाव, सावरगाव, गोवर्धन, पिंपळगाव गरुडेश्‍वर, नागलवाडी परिसरातील स्थानिक शेतकर्‍यांमार्फत गाळ काढण्यासाठी जलसंपदा विभागाकडे मागणी केली जात होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिक येथे आले असताना काही सेवाभावी संस्थांनीदेखील या उपक्रमात सहभागी होऊन धरणातील गाळ काढण्याबाबत निवेदन दिले. त्यानुसार तात्काळ मंजूरी देण्यात येऊन जलसंपदा मंत्र्यांनी एक यंत्रदेखील उपलब्ध करून दिले. शेतकर्‍यांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेता यांत्रिकी विभागामार्फत आणखी दोन यंत्र उपलब्ध करून देण्यात आले आहे. शेतकर्‍यांनी याचा लाभ घेऊन गाळ शेतात वाहून न्यावा, असे आवाहन जलसंपदा विभागामार्फत करण्यात आले आहे.