Breaking News

राज्यपरिवहन महामंडळातील कामगार 26 एप्रिल रोजी सामूहीक रजेवर?

नाशिक, दि, 18 - राज्य परिवहन
महामंडळाच्या वेतन कराराच्या मसुद्यातून काही मुद्दे वगळून मान्यता दिल्याची घोषणा परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी केल्याने कर्मचार्‍यांवर अन्याय होणार असल्याची भूमिका एसटी कामगार संघटनेने घेतली आहे. कराराला सर्व मुद्द्यांसह मान्यता द्यावी, या मागणीसाठी राज्यभरातील कर्मचारी 26 एप्रिलला परिवहनमंत्री दिवाकर रावते यांची भेट घेणार आहेत. यामध्ये सत्तर हजार कर्मचारी सुटी टाकणार असल्याचा दावा एसटी कामगार संघटनेने केल्याने महामंडळाची वाहतूक विस्कळित होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
परिवहनमंत्री रावते यांनी कर्मचार्‍यांसाठी असलेल्या कामगार करारावर स्वाक्षरी केली. मात्र, त्यातील विविध बारा मुद्दे वगळल्याचा आरोप एसटी कामगार संघटनेने केला आहे. वगळलेले बहुतांश मुद्दे हे मान्यताप्राप्त कर्मचारी संघटनेच्या अधिकारातील असल्याने या करारात संघटनेवर अन्याय होत आहे. संघटनेचे अधिकार काढून घेण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप संघटनेतर्फे केला आहे. या संदर्भात परिवहनमंत्री रावते यांच्यासह इतर अधिकार्‍यांची भेट घेणार असल्याचे संघटनेने कळविले आहे. 26 एप्रिलला राज्यभरातील सुमारे 70 हजार कर्मचारी सुटी टाकून मंत्री, अध्यक्षांच्या भेटी घेणार असल्याचे सांगितले जात आहे.