सातार्यातील तिघांवर मोक्कांतर्गत कारवाई
सातारा, 04 - लुटमार आणि जबरी चोरीसारखे अनेक गुन्हे दाखल असणार्या सातारा तालुक्यातील खावली येथील अक्षय पोपट धस, संगमनगर येथील मंगेश दत्तात्रय यादव आणि कराड तालुक्यातील वडोली भिकेश्वर येथील नेताजी सुभाष धुंदरे या तिघांच्या विरोधात मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिली आहे.
वडूज गावच्या हद्दीतून कातरखटावकडे जाणार्या रोडवर एका जोडप्याला तिघांनी मारहाण केली होती. मारहाण करताना अक्षय धस, मंगेश यादव, नेताजी धुंदरे यांनी जोडप्याला कोयत्याचा धाक दाखवून मंगळसूत्र व इतर दागिने असा सुमारे 36 हजार रुपयांचा ऐवज लुटला होता. यावेळी जोडप्याच्या हात, मान तसेच अंगावर कोयत्याने वार केले होते. घटनेचा तपास करत पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली होती. या तिघांच्याविरोधात
मोक्कांतर्गत कारवाईचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अतिरिक्त पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, पी. व्ही. जाधव यांनी तयार करत कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक यांच्याकडे सादर केला. हा प्रस्ताव मंजूर केल्याने अक्षय धस, मंगेश यादव, नेताजी धुंदरे या तिघांच्या विरोधातील दोषारोपपत्र मोक्का न्यायालयात लवकरच दाखल करण्यात येणार आहे. प्रस्ताव तयार करण्यासाठी वडूज पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक वाघमारे, हवालदार प्रवीण शिंदे यांनी मदत केली.