सातार्यात पत्नीचा खून करून पतीची आत्महत्या
सातारा, 04 - सातारा शहरानजीक गोडोली येथील हॉटेल राजयोगच्या लॉजमधील एका खोलीत सातारा तालुक्यातील आसनगाव-कुमठे येथील श्रीकांत बाळासाहेब निमज (वय 30) यांनी पत्नी नैना (वय 25) हिचा गळा कापून खून केला व त्यानंतर खोलीतील हुकाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, सातारा तालुक्यातील आसनगाव-कुमठे येथील श्रीकांत निमज यांचा विवाह सुमारे तीन वर्षापूर्वी अंभेरी (ता. खटाव) येथील नैना हिच्याशी झाला होता. लग्नानंतर त्यांच्यामध्ये नेहमीच कौटुंबिक वाद होत असत. या वादामुळे गेल्या काही महिन्यांपासून श्रीकांत निमज हे पत्नी नैना, मुलगा आराध्य (वय 2) आणि आई वडिलांसमवेत सातार्यातील रविवार पेठेतील एका फ्लॅटमध्ये राहत होते.
श्रीकांत निमज हे भारतीय सैन्य दलाच्या सिग्नल कोअरमध्ये नोकरीस होते. सध्या त्यांची नेमणूक डेहराडून येथे होती.
सुमारे 10 दिवसांपूर्वी ते सुट्टी घेवून घरी परतले होते. ते पत्नी नैना हिच्या समवेत गोडोली येथील हॉटेल राजयोग मध्ये आले. या ठिकाणी त्यांनी लॉजमधील खोली भाड्याने घेतली. रात्री उशिरापर्यंत दोघेही बाहेर न आल्यामुळे हॉटेलच्या कर्मचार्यांनी दुसर्या चावीने दरवाजा उघडला. यावेळी नयना हिचा गळा चिरल्याचे तसेच श्रीकांत याने गळफास लावून घेतला असल्याचेही त्यांच्या निदर्शनास आले. या घटनेची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात झाली आहे. दरम्यान, सततच्या कौटुंबिक वादाला कंटाळून पत्नी नैना यांचा खून करुन श्रीकांत निमज यांनी आत्महत्या केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. मृत श्रीकांत आणि नैना यांच्या पश्चात
आई-वडील, भाऊ, बहीण, मुलगा आराध्य असा परिवार आहे.