भारतापासून नाही तर भारतामध्ये स्वातंत्र्य हवे : कन्हैया कुमार
नवी दिल्ली, 04 - देशद्रोहाचा आरोप असलेला जेएनयू छात्र संघाचा अध्यक्ष कन्हैया कुमारची तिहार तुरुंगातून सुटका झाली. त्यानंतर जेएनयूमध्ये त्याचे हिरोसारखे स्वागत झाले. कन्हैयाने जेएनयू कॅम्पसमध्ये भाषण करत मोदी सरकारवर सडकून टीका केली.
पंतप्रधान मोदी मन की बात करतात, पण ऐकत नाहीत, या शब्दांत त्याने मोदींना टोला लगावला. तसेच भाजप सरकारने कारस्थान रचून मला जेलमध्ये टाकल्याचा आरोप कन्हैय्याने केला. आम्हाला भारतापासून स्वातंत्र्य नाही तर भारतामध्ये स्वातंत्र्य हवे, असेही कन्हैया म्हणाला. कन्हैयाने मोदींसोबतच एबीव्हीपीवरी जोरदार हल्ला चढवला. आम्ही ’अभाविप’ला शत्रू मानत नाही, विरोधक मानतो. ’अभाविप’ने जेएनयूमधील त्यांचा पराभव आठवावा. मी ’अभाविप’ची शिकार करणार नाही, कारण शिकार त्यांचीचे केली जाते, जे शिकारीसाठी लायक आहेत, असे कन्हैया कुमार म्हणाला.
त्याचबरोबर कन्हैयाने रोहित वेमुलासह विविध मुद्यांवरही सरकारसह राष्ट्रीय सेवा संघावरही टीका केली. गेल्या 21 दिवसांपासून कन्हैया दिल्लीतल्या तिहार जेलमध्ये होता. दिल्ली उच्च न्यायालयाने कालच कन्हैया कुमारला सहा महिन्यांचा अंतरिम जामीन मंजूर केला. काँग्रेस नेते आणि ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी काल कन्हैयाची बाजू कोर्टात मांडली होती.