Breaking News

खंजीर खुपस्या कोण



आ. अनिल गोटे यांचे छगन भुजबळ यांना खुले पत्र - भाग 1
प्रति,
छगन चंद्रकांत भुजबळ,
माजी महापौर, मुंबई,
माजी उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, बांधकाम मंत्री, माजी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष, आमदार येवला
सद्यस्थितीत आरोपी नं.1
मुक्काम - अंडा बॅरक नंबर -12,
आर्थर रोड, मध्यवर्ती कारागृह,
भायखळा, मुंबई.
महोदय,
आपण 868 कोटी रूपयाची मालमत्ता कोठून आणली याचा समीर भुजबळ आणि आपल्या सहकार्‍यांनी तपशीलात दिल्यामुळे आपणास सक्तवसुली संचालनालयाने अटक केली आली.
एवढ्या मोठ्या शेकडो कोटी रूपयांच्या उगमस्थानाबाबत आपण प्रारंभापासून मौन धारण केले ते केलेच! म. गांधींनी सर्वप्रथम ब्रिटीशांविरूध्द मौनाचा हत्यार म्हणून वापर केला. नंतर मा. अण्णा हजारे, अखेर म. गांधीचे पट्ट शिष्य आपणच!! आपल्या सर्वच नेत्यांनी आपली अटक राजकीय सुडभावनेपोटी केली असल्याचे घसा कोरडा करून आपण सातत्याने सांगितले. महाराष्ट्रातील परिचीत आपला आवेशपूर्ण अवतार माझ्यावर अन्याय झाला, असे प्रसार माध्यमांसमोर बोलतांना अजिबात जाणवला नाही. विधीमंडळात आपल्या अभिनय कौशल्यावर, हावभावावर आक्रस्तळेपणा करून विरोधकांना नामोहरम करणे, ही तर, आपणांस मिळालेली परमेश्‍वरी देणगीच होय ! राजकारणात आपल्या प्रवेशाने महाराष्ट्र एका एका अभिनय सम्राटाला मुकला असे मला मनापासून वाटते. नटसम्राट नाना पाटेकर सुध्दा आपल्या अभिनयापुढे किस झाड की. पत्ती!! कुबेराला एवढी प्रचंड संपत्ती असतांनाही विधीमंडळात गरीबांच्या प्रश्‍नांवर तळमळून बोलणारे प्रसंगी आवाजात कँप निर्माण करून कारूण्यरसाने ओतप्रत भरलेले भाषण देणारे भुजबळ हेच का? असा प्रश्‍न कुणालाही पडावा इतका बेमालूम अभिनय करणारा नटसम्राट गेल्या शतकात महाराष्ट्रात झाला नाही. आपली जाहीर सभांमधील भाषणे, त्यातला अभिनय, समोरच्याची टिंगल उडविण्यासाठी केलेली नक्कल, आवाज चढवून बोलणे, आपल्या गर्जना या गुणांचा पुरेपुर वापर करीत मा. न्यायालयासमोर हात जोडून उभे राहून अश्रूंना वाट मोकळी करून देवून सुध्दा कामी आली नाही. असो ! मा. न्यायमूर्तीसमोर आरोपीच्या पिंजर्‍यात उभे राहून केलेले आर्जव, आपली अगतिकता आणि हात जोडून, वाकून शालिनतेने उभे राहण्याची आपली स्टाईल... सर्वात कहर म्हणजे न्यायाधिशांसमोर आपण भावनाविवश होऊन रडण्याचा केलेला जातीवंत अभिनय ! सर्वच वृत्त पत्रात व वृत्तवाहिन्यांनी प्रकर्षाने उल्लेखीत केला.
मानले छगनराव तुम्हाला नेता आणि अभिनेता दोन्ही गुणांचे आपल्यामधे असलेले रसायन काही औरच ! आपण व आपले नेते वारंवार एकच घोषा लावून आहेत. राहतील. तो म्हणजे आम्ही 15 वर्षे सत्तेत होतो पण कधी सूडभावनेने वागलो नाही यास आपले विस्मरण म्हणावे ! की, लबाडी? की कोडगेपणा? काय म्हणावे? हेच समजत ना़ही सार्वजनिक निर्लज्जपणा एवढ्या एका शब्दातच सरयाचे वर्णन करता येईल. आपण उपमुख्यमंत्री  झालात! गृहमंत्री झालात! आणि आपल्या आकांक्षांना पंखच फुटले. हिंदुह्रदयसम्राट मा. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे तर, आपणावर व आपल्या कुटुंबियावर जन्मदात्यापेक्षा जास्त उपकार आहेत असे कित्ती-कित्ती वेळा बोलतात याची मोजदाद करणे कठीणच! मुंबईचे महापौर पद आपणांस दुसर्‍यांदा मिळाले, ते स्वर्गीय बाळासाहेबांच्याच कृपेने! दुसर्‍यांदा आपणांस महापौर पद द्यावे अशी स्वर्गीय बाळासाहेबांची अजिबात इच्छा नव्हती. तरी सुध्दा पत्रकारीतेतील माझे गुरू लोकसत्तेचे माजी संपादक, थोर साहित्यिक, नाटककार कै. अण्णासाहेब ऊर्फ विद्याधर गोखले यांनी मुंबई सेंट्रलच्या प्लॅटफार्मवर बसून आपणासाठी पत्र लिहिले. मातोश्रीवर पोहचविण्याची जबाबदारी माझेकडेच सोपविली.
कै. बाळासाहेबांनी आपणावर केलेले उपकार आपल्या चामड्याचे जोडे करून त्यांच्या पायात घातले असते तरी, त्यांच्या उपकारांची फेड होऊ शकली नसती. एखाद्या खाटकाप्रमाणे दुसर्‍यांची चामडी सोलटवायची सवय असलेल्या आपल्यासारख्या माणसाकडून खरेतर, अशी अपेक्षा करणे चुकच! स्वर्गीय बाळासाहेबांशी गद्दारी करून त्यांच्या पाठीत खंजीर खुपसून, विश्‍वासघात करून आपण काँग्रेसवासी झालात! स्वर्गीय बाळासाहेब व माँसाहेब कै. मिनाताई ठाकरे यांनी आपणावर केलेल उपकार, पुत्रवत प्रेम याचे त्याक्षणी यत्किँचतही स्मरण न करता केवळ आणि केवळ एका शुल्लक क्षुद्र मंत्रीपदासाठी शिवसेना सोडून आपण निघून गेलात ! यावरूनच खरेतर, तुमच्या कोडगेपणाची, निष्ठूरतेची आणि ह्रदयशून्यतेची कल्पना येते ! असो ! आपण शिवसेनेचा त्याग केल्यानंतर, राजकीय गॉडफादर म्हणून स्विकारले ते शरद पवारांना ! कै. वसंत दादा पाटलांशी केलेल्या दगलबाजीसाठी महाराष्ट्र शरद पवारांना जास्त चांगला ओळखतो या पार्श्‍वभूमीवर आपली गुरू-शिष्याची जोडी आदर्शच! जाहीर सभांमधून स्वर्गीय बाळासाहेबांची केलेली कुचेष्ठा, आरोपीचे वर्णन करतांना वजन 30 किलो गळ्यात माळा 5 किलो, शरीर यष्टी हाडकूळी, डोळ्यावर काळा चष्मा, अन लुंगी कुर्ता यापेक्षा खालच्या शब्दात तुम्ही साहेबांची अवहेलना केली. नियती याचा हिशेब चुकता केल्याशिवाय रहाणार नाही. शिवसेनेत राहिला असता तर, महाराष्टाचे नेतृत्व आपोआपच आपणाकडे आले असते. कदाचित राज्याचे मुख्यमंत्री होऊ शकला असता. परंतु महाराष्ट्राचे भाग्य!!! तुमच्या तावडीतून महाराष्ट्राची जनता सुटली. शिवसेनेत जे मिळाले ते स्वर्गीय बाळासाहेबांच्या आशिवार्दाने आणि आपल्या शिवसेनेतील कतृत्वाने ! आताचे ऐश्‍वर्य मिळाले तुमच्या कतृत्वाने नव्हे तर, शिवसेनेशी केलेली गद्दारी अन पुत्रवत प्रेम करणार्‍या स्वर्गीय बाळासाहेब व माँसाहेबांच्या विश्‍वासघातापोटी शरद पवारासारख्या चाणाक्ष नेत्यांने दिलेली मनसबदारी होय! आपण केलेल्या विश्‍वासघाताची, बेईमानीची गद्दारीची शरद पवारांनी चुकती केलेली किंमत याशिवाय माझ्या लेखी जास्त महत्व नाही. शरद पवारांसमवेत राजकीय वाटचाल करीत असतांना माझ्या म्हणण्याचा अनुभव क्षणोक्षणी आला आहेच! याची कबुलीही आपण वेळोवेळी दिली आहे. आमचा पक्ष म्हणजे छूपा मराठा महासंघ हे तर आपले ब्रिद वाक्य! आज आपण हे सत्य स्विकारणार नाही हा भाग वेगळा ! सत्य स्विकारण्याची तुमची प्रवृत्ती नाही आणि तेवढे धाडसही नाही. (क्रमशः)