Breaking News

राज्यात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी स्वस्त होणार : गिरीष बापट

मुंबई, दि.04 -  महाराष्ट्रात पेट्रोल, डिझेल, एलपीजी सिलेंडर आणि रॉकेलचे दर कमी होणार आहेत. ग्राहक संरक्षण मंत्री गिरीष बापट यांनी यासंदर्भातील माहिती दिली. पेट्रोलवर 95 पैसे, डिझेलवर 66 पैसे आणि घरगुती इंधनावर काही प्रमाणात सूट मिळणार आहे.  
तेल कंपन्यांकडून लावला जाणारा अधिभार कमी करण्यासाठी गिरीष बापट यांनी आज पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची भेट घेतली. त्यानंतर झालेल्या बैठकीत सकारात्मक निर्णय झाला. तेल कंपन्या राज्य विशेष अधिभाराद्वारे अतिरिक्त वसुली करत असल्याची तक्रार फेडरेशन ऑफ ऑल महाराष्ट्र पेट्रोल डिलर असोसिशने केली होती. यानंतर बापट यांनी तेल कंपन्यांची बैठक घेतली. या बैठकीत तेल कंपन्यांनी अतिरिक्त वसुली केल्याचं मान्य केलं. त्यानंतर तेल कंपन्यांनी राज्य विशेष अधिभार कमी करण्यासंदर्भातील प्रस्ताव केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे पाठवला होता. या प्रस्तावाचा पाठपुरावा करत बापट यांनी आज प्रधान यांची भेट घेतली. केंद्रीय मंत्र्यांनीही या प्रस्तावाला मान्यता दिली.