Breaking News

भारताकडून युएईचा नऊ विकेट्सनी धुव्वा

मिरपूर, दि.04 -  महेंद्र सिंह धोनीच्या टीम इंडियाने युएईचा नऊ विकेट्सनी धुव्वा उडवून ट्वेन्टी-20 आशिया चषकात आपला सलग चौथा विजय साजरा केला. भारतीय संघाने या सामन्याआधीच आशिया चषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. 
यामुळे टीम इंडियाने या सामन्यात भुवनेश्‍वर कुमार, हरभजन सिंग आणि पवन नेगी ही म्यानातली अस्त्रेही परजून पाहिली. या पार्श्‍वभूमीवर युएईवरचा दणदणीत विजय हा भारतीय संघाचा फायनलसाठीचा आत्मविश्‍वास उंचावणारा ठरला आहे.  आशिया चषकात आपल्या अखेरच्या साखळी सामन्यात अवघ्या 82 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचा सलामीवीर रोहित शर्माला लय सापडली. रोहितने 28 चेंडूंमध्ये 7 चौकार आणि एका षटकारासह 39 धावांची खेळी केली. रोहित बाद झाल्यावर शिखर धवनने नाबाद 16 तर युवराज सिंहने नाबाद 25 धावांची खेळी करुन भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
त्याआधी भारतीय गोलंदाजांनी युएईला वीस षटकांत 9 बाद 81 धावांवर रोखले होते. भारताकडून भुवनेश्‍वर कुमारने दोन विकेट्स काढल्या, तर जसप्रीत बुमरा, हार्दिक पंड्या, हरभजन सिंह, पवन नेगी आणि युवराज सिंहने प्रत्येकी एक विकेट काढून भारताच्या विजयाला हातभार लावला.