संसदेत जे काही घडत आहे त्यामुळे देश चिंतेत : नरेंद्र मोदी
नवी दिल्ली, 03 - लोकसभेत विरोधकांनी गोंधळ घालून देशाबरोबर विरोधक स्वत:चे नुकसान करत आहेत, असे मोदी म्हणाले. गेले काही दिवस संसदेत जे काही घडत आहे त्यामुळे देश चिंतेत आहे. संसदेचे कामकाज चालवण्याची जबाबदारी सर्व खासदारांची आहे, हे मी नव्हे तर राजीव आणि इंदिरा गांधी म्हणाल्या होत्या, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी टोलेबाजीला सुरुवात केली.
काँग्रेसला टोले लगावण्यासाठी मोदींनी काँग्रेसचेच शस्त्र वापरले. यासाठी त्यांनी राजीव गांधी आणि इंदिरा गांधींच्या भाषणांचा उल्लेख केला. देशाची कमजोरी जगासमोर दाखवू नका, असे इंदिरा गांधी म्हणाल्या होत्या. तसेच देशासाठी जी विधेयके महत्त्वाची आहेत, ती पारित होऊ द्या, असे आवाहन करत मोदींनी राजीव गांधींचा दाखला दिला. गेल्या काही दिवसात रोहीत वेमुला, जेएनयू प्रकरणात संसद ठप्प पडल्याच्या प्रकरणावर मोदींनी विरोधकांना खुमासदार शैलीत चिमटे काढले. विरोधी पक्षातही काही चांगले खासदार आहेत. पण ते बोलले तर आपल्यापुढे जातील या न्यूनगंडातून विरोधीपक्षातले काही खासदार संसद ठप्प पाडतायत, असे मोदी म्हणाले.