Breaking News

मुंबईत उपाहारगृह व्यावसायिकांसाठी पायघड्या

मुंबई, प्रतिनिधी, दि. 28 -  मुंबईत उपाहारगृह विविध 38 प्रकारचा व्यवसाय सुरू करण्यासाठी पालिका आरोग्य विभागातर्फे देण्यात येणार्‍या परवानग्या आता सुलभ होणार आहेत. एक खिडकी योजनेंतर्गत सार्वजनिक आरोग्य विभागाकडून सर्व प्रकारच्या परवानग्या दिल्या जाणार असल्याने मुंबईत अशा प्रकारचे व्यवसाय सुरू करणे करणे सोपे जाणार आहे. आहार, एच. आर. ए. डब्ल्यू आणि नॅशनल रेस्टॉरंट असोशिएशन आदी विविध व्यवसायिक संघटनांनी पालिकेकडे मागणी केल्यानंतर प्रशासनाने त्यांच्यासाठी परवानगीची प्रक्रिया सहज आणि सोपी करत एक प्रकारे त्यांच्यासाठी पायघडयाच अंथरल्या आहेत.
नवीन उपाहारगृह, लॉजिंग हाऊस, परमीट रुम, बिअरबार, मिठाईचे दुकान, खाद्यपदार्थ विक्रीची दुकाने, शीतपेय विक्रीची दुकाने, पिठाच्या गिरणी, फ्रूट ज्युस सेंटर, खाद्य पदार्थासाठीची शीतगृहे, लॉड्री शॉप, दुधाचे दुकान, हेअर सलून, औषधांची दुकाने, पानाची गादी, बेकरी शॉप, घोडयाचे तबेले, उसाच्या रसाची दुकाने, पापड निर्मिती, सोडा वॉटर निर्मिती, चहा विक्री दुकान, खाद्यतेल निर्मिती उद्योग आदी 38 प्रकारचे व्यवसाय सुरू करण्यासाठी महापालिकेचा सार्वजनिक आरोग्य विभाग परवानगी देतात. हे सर्व व्यावसाय सुरू करण्यासाठी यापूर्वी महापालिकेच्या इमारत व कारखाने विभागाचे आणि अग्निशमन दलाचे ना-हरकत प्रमाणपत्र सार्वजनिक आरोग्य विभागाकडे सादर करणे बंधनकारक होते. मात्र ही अट आता सुधारित करण्यात आली असून त्यानुसार केवळ अग्निशमन दलाचे ना-हरकत प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
ईड ऑफ डुईंग बिझनेसअंतर्गत व महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या आदेशानुसार पालिकेच्या नागरी सेवा सुविधांशी संबंधित विविध अर्जाच्या मसुद्यांचे व प्रक्रियांचे सुलभीकरण करण्यात येत आहे. या माध्यमातून महापालिकेने महत्त्वाचा टप्पा गाठल्याचे महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी स्पष्ट केले.