शिक्षणाधिकार्यांकडून पाथर्डीत तपासणी
अहमदनगर । प्रतिनिधी । 28 - पाथर्डी शहरातील परीक्षा केंद्रांवर कॉपीबहाद्दरांचा शिक्षकांनाही त्रास होत असल्याने शुक्रवारी गटशिक्षणाधिकार्यांच्या बैठया पथकाने गणिताच्या पेपरदरम्यान पाच विद्यार्थ्यांना कॉपी करताना पकडले. या तालुक्यात यापुढे अधिक लक्ष केंद्रीत केले जाणार आहे.
पाथर्डी शहरातील दहावी आणि बारावीची परीक्षा केंद्रे कॉपीच्या विळख्यात सापडली आहेत. गतवर्षी येथे पेपर पळवल्याची घटना घडली होती. यावर्षी शिक्षक पोलिसात बंदोबस्त मागण्यास गेले असता पोलीस निरीक्षकाने शिक्षकासच शिवीगाळ केली आहे. शुक्रवारी गणिताचा पेपर होता. गटशिक्षणाधिकार्यांनी ठिय्या दिला असतानाही कॉपीचे प्रकार सुरु होते. एम.एन. निराळे येथील केंद्रावर पाच परीक्षार्थी कॉपी करताना पकडण्यात आले. पुढील सर्व पेपरला पाथर्डी शहर आणि तालुक्यातील केंद्रावर लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे. या परीक्षेच्या काळात शहरातील झेरॉक्स मशीन केंद्र बदी, जमावबंदी सक्तीने पाळण्यासाठी पोलीस प्रशासनाशी चर्चा करणार असल्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी लक्ष्मण पोले यांनी सांगितले. पाथर्डी शहरात अनेक विद्यार्थी खास परीक्षेसाठीच येतात. या काळात शहरातील लॉजेस देखील हाऊसफुल्ल असतात अशी माहिती अनेक शिक्षकांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणली आहे. पोलीस प्रशासनाकडूनही कारवाईची प्रतीक्षा आहे.