Breaking News

हगणदारीमुक्त शहरात पुरस्कारांसाठी जोरदार चुरस

मुंबई, प्रतिनिधी, दि. 01 - राज्यातील नगरपालिका, नगर परिषद स्तरावरील 51 हगणदारीमुक्त शहरात पुरस्कारासाठी जोरदार चुरस होणार आहे. ही तपासणी लवकरच होणार असून, यासाठी जाणकारांच्या समित्या स्थापन केल्या आहेत. 
नगरविकास विभागाने राज्यातील 51 शहरे आणि कोल्हापूर ही एकमेव महापालिका हगणदारीमुक्त म्हणून काही दिवसांपूर्वी जाहीर केली होती. हे जाहीर करताना नगरविकास विभागाने या शहरासाठी पुरस्कार देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. यानुसार या शहरांमध्ये स्पर्धात्मक पद्धतीने चुरस लावून त्यातील काही शहरांना स्वच्छतेचे पुरस्कार देण्यात येणार आहेत. भरीव आर्थिक स्वरूपातील या पुरस्कारासाठी या 52 शहरांना तपासणीला सामोरे जावे लागणार आहे.
 तपासणीनंतर या शहरांना गुण देण्यात येणार आहेत. तपासणी करताना जाणकारांच्या दहा समित्या करण्यात येणार असून, प्रत्येक समितीत चार जाणकार आहेत. यामध्ये शासकीय, अशासकीय, पत्रकार; तसेच एनजीओचे प्रतिनिधी यांचा समावेश आहे. या समित्या प्रत्येक शहरात किमान एक व मोठ्या शहरासाठी जास्तीत जास्त दोन दिवस तळ ठोकून राहतील. यादरम्यान शहरातील स्वच्छतेविषयी पाहणी करतील; तसेच शहराची लोकसंख्या विचारात घेऊन त्यासाठी बांधलेल्या शौचालयाची संख्या याबाबत तपासणी करतील. सार्वजनिक आणि वैयक्तिक पातळीवर शौचालये बांधण्याचे उद्दिष्ट पूर्ण करताना यामध्ये कोणत्या नाविन्यपूर्ण कल्पनांचा अवलंब केला आहे, याचाही विचार यामध्ये होणार आहे.