जि.प.वर भगवा फडकविण्याचे भाजपाला वेध
अहमदनगर । प्रतिनिधी । 01- भाजपाला आता पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेवर भगवा फकडविण्याचे वेध लागले आहेत. त्यादृष्टीने प्रत्येक गटाचा प्रमुख नियुक्त करून व्यूहरचना आखण्याची घोषणा नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड यांनी केली आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी पारंपरिक भाजप-शिवसेना-रिपाइं युती कायम राहील, असेही त्यांनी संकेत दिले आहेत.
भाजपाच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना बेरड म्हणाले, जिल्ह्यात झालेल्या नगरपंचायत-नगर परिषद निवडणुका संपूर्ण ताकदीने लढविल्या. त्यामुळे पक्षाला बर्यापैकी यश मिळाले आहे. शासनाच्या योजनांचा चांगला प्रचार केला. प्रत्येक पंचायत समितीचा सभापती हा भाजपाचा झाला पाहिजे. जिल्हा परिषदेवर भाजपाचा झेंडा फडकविण्यासाठी आता तयारी करायची आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या 75 गटांमध्ये पक्षाचा गटप्रमुख नियुक्त केला जाईल.
त्याच्याकडून निवडणुकीची आखणी केली जाईल. 11 जून 2015 रोजी बेरड यांची पहिल्यांदा ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी निवड झाली होती. त्यानंतर पक्ष संघटनेच्या कामाला गती मिळाली. चार लाख सदस्य नोंदणी आणि दीड हजार सक्रीय सदस्य केले आहेत. ऑनलाईन सदस्य नोंदणीत नगर जिल्हा आघाडीवर राहिला, असा आढावा बेरड यांनी निवडीपूर्वी घेतला. पक्षाचे संघटन मंत्री किशोर काळकर यांनीही जिल्ह्यात भाजपा सक्षम असून यापुढे जिल्हा परिषदेवर भाजपाचाच झेंडा असेल, अशी आशा व्यक्त केली. या बैठकीत नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष दिलीप भालसिंग, विश्वनाथ कोरडे, अशोक खेडकर, रवींद्र सुरवसे, बापूसाहेब पाटेकर, माणिक खेडकर, सुनील वाणी, नंदकुमार जेजूरकर, काशिनाश पावसे, बाळासाहेब महाडीक आदींचा साबळे यांच्या हस्ते सत्कार झाला.
कोपरगाव ग्रामीण आणि कोपरगाव शहर मंडलाध्यक्षांच्या निवडी लवकरच जाहीर केल्या जातील, असे काळकर यांनी सांगितले.