Breaking News

तंबाखूजन्य पदार्थ विक्रेत्यांचा 18 मार्चला मोर्चा

मुंबई, प्रतिनिधी, दि. 01 - राज्यातील सुमारे सव्वाकोटी लोकांची उपजीविका तंबाखूजन्य वस्तू उत्पादन व विक्री व्यवसायावर चालते. सरकार सातत्याने अनेक निर्बंध लादत हा व्यवसाय बंद करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र त्याआधी या व्यवसायावर अवलंबून असलेल्या शेतकरी, शेतमजूर, छपाईदार, फेरीवाले, घाऊक व किरकोळ विक्रेते यांचे पुनर्वसन करण्याची गरज आहे.
 परिणामी 18 मार्चला सरकारला जाब विचारण्यासाठी आझाद मैदानावर धडक मोर्चा घेऊन संघटना धडक देईल, असे संघाचे अध्यक्ष शशांक राव यांनी सांगितले. सिगारेट आणि अन्य तंबाखूजन्य उत्पादने कायदा अर्थात कोटपा कायदा अंतर्गत 2015 साली झालेल्या सुधारणेतील जाचक सुधारणा शिथील करण्याची मागणी मुंबई विडी तंबाखू व्यापारी संघाने केली आहे. या सुधारणेनंतर प्रथमच एका विक्रेत्याला अटक झाल्याची घटना माटुंगा येथे घडल्यानंतर संघाने गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत आक्रमक पवित्रा घेतला आहे. 18 वर्षाहून कमी वयाच्या मुलाला तंबाखूजन्य पदार्थाची विक्री करणार्‍या व्यापार्‍याला सुधारित नियमानुसार देण्यात येणार्‍या शिक्षेला संघाचा विरोध असल्याचे कार्याध्यक्ष नंदकुमार हेगिष्टे यांनी सांगितले.
हेगिष्टे म्हणाले की, 18 वर्षाखालील मुलांना तंबाखूजन्य पदार्थ विकण्यास व्यापार्‍यांना परवानगी नको आहे. मात्र 15 ते 17 वयोगटातील मुलेही 18 वर्षावरील वाटतात. अशा परिस्थितीत प्रत्येक ग्राहकाचे ओळखपत्र तपासणे व्यापार्‍यांना शक्य नसते. मात्र मुद्दामहून अन्न व औषध प्रशासन, पोलीस प्रशासन कारवाई करण्यासाठी सापळा रचताना याच वयोगटातील मुलांचा वापर करतात. या कारवाईत 7 वर्षापर्यंत सक्त मजुरी किंवा 5 लाख रुपयांपर्यंत दंडाची तरतूद केलेली आहे. एवढया कठोर शिक्षेची तरतूद अन्य कोणत्याही कायद्यात नाही. त्यामुळे शिक्षेत थोडी शिथीलता आणण्याची व्यापार्‍यांची मागणी असल्याचे त्यांनी सांगितले. एकटया महाराष्ट्र सरकारनेच राज्यात सुगंधी सुपारी आणि सुगंधी तंबाखूवर बंदी घातली आहे. मात्र इतर कोणत्याही राज्यात बंदी नसल्याने चोर मार्गाने बंदीनंतरही प्रत्येक विभागात सुगंधी सुपारी आणि सुगंधी तंबाखूची विक्री जोमाने सुरू आहे.
या बंदीमुळे सरकारला मिळणारा महसूल बंद झालाच आहे. मात्र कारवाईचे सोंग करणार्‍या पोलीस आणि अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकार्‍यांच्या घशात कोट्यवधी रुपयांचा काळा पैसा जमा होत आहे. त्यामुळे देशात बंदी नसताना राज्यातील बंदी उठवण्याची मागणी राव यांनी केली आहे.