Breaking News

मराठा तितुका घोळवावा,... सत्तेचा धर्म वाढवावा...

मराठा तितुका मेळवावा महाराष्ट्र धर्म वा ढवावा, असे घोषवाक्य एकुणच महाराष्ट्राच्या मातीतील ऐक्य निर्देशित करते. गेले कित्येक वर्ष अभिमानाने वर्णन केले जात असलेल्या या वाक्याचा संदर्भ आता बदलला, नव्हे जाणीवपूर्वक बदलला गेला आणि मराठा म्हणजे महाराष्ट्र अशी सांघीक छबी पुसण्याचे काम राजकारण्यांनी केले.  
आता मराठा म्हणजे महाराष्ट्र नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, छत्रपती शाहु महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात राहणार्‍या विविध जातीतील एक जात, असा संदर्भ देऊन महाराष्ट्राच्या ऐक्याला तडे देण्याचे काम राजकारण्यांनी केले आणि आरक्षण चळवळीला धुनी देऊन ही तेड आणखी धगधगत ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शिवजयंतीचे औचित्य साधून रायगडावर मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा हा त्याच प्रयत्नांचा एक भाग आहे आणि मराठा तितुका घोळवावा, सत्तेचा धर्म वाढवावा असा नवा अध्याय सुरू केला आहे.
खरे तर आरक्षण हा आपला आजचा विषय नाही. पण आरक्षणाच्या मुद्द्यावर राजकारण करून राज्य आणि देशपातळीवर इंग्रजनिती वापरणार्‍या बुध्दीवादी पंडीतांचा हेतू स्पष्ट करणे काळाची गरज असल्याने, त्याचा उहापोह क्रमप्राप्त ठरतो. शिवजयंती सोहळ्याला मुख्यमंत्री फडणवीस रायगडावरील सोहळ्याला आवर्जून उपस्थित होते. कुण्या एका जातीसाठी नव्हे तर रयतेसाठी लढणारा, रयतेचे स्वतःचे राज्य म्हणजे स्वराज्य उभारणारा राजा म्हणून छत्रपतींची ख्याती जगाच्या इतिहासात नोंदविली गेली आहे. जात सोडा, पण धर्माच्या भिंतीही राजा शिवछत्रपतींना रयत कल्याणासाठी रोखू शकल्या नाहीत. त्या छत्रपतींच्या जयंतीदिनी, महाराजांच्या कर्तुत्वाचा साक्षीदार असलेल्या रायगडावर मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा आगंतुकपणे उपस्थित करण्याचा हेतू काय? देवेंद्र फडणवीस यांना आपल्या घोषणेतून नेमके काय साध्य करायचे होते. हा प्रश्‍न किती मराठ्यांना पडला. हा संशोधनाचा विषय असला तरी आमच्यासारख्या बहुजनांच्या चळवळीत काम करणार्‍या सार्‍याच कार्यकर्त्यांना मात्र सतावतो आहे. खरे तर तिकडे हरियाणात जाट समाजाच्या आरक्षण मुद्यांवर आंदोलनाचा भडका उडाला असतांना आरक्षणासाठी आक्रमक झालेला मराठा समाज शांत आहे. या शांत असलेल्या समाजाला चिथावणी देण्यासाठी तर मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली नसावी ना. असा खोडी काढणारा प्रश्‍नही आमच्या शंकेखोर मनाला चाटून गेला. शिवाजी महाराजांच्या जयंतीचेच औचित्य का? मराठा आरक्षण चळवळीचे अग्रणी समजणारे विनायक मेटे शेजारी होते म्हणून त्यांनी त्यांच्या जखमेवरची खपली काढली तर नाही ना? नाना प्रश्‍न आहेत. त्याहीपेक्षा भयानक सत्य हे आहे की, शिवजयंतीला मराठा आरक्षणाची खपली काढायची म्हणजे या राजाला मराठा समाजापुरते मर्यादित करून टाकायचे, असा तर त्यांचा डाव नाही ना? तसे नसेल तर, मग या राज्यात केवळ मराठाच नाही तर धनगर आणि अल्पसंख्यांक समाजदेखील आरक्षणाची मागणी करीत आहे. त्यावर मुख्यमंत्री चकार शब्दही बोलत नाहीत. यालाच म्हणतात खरा ब्राम्हणवाद. मराठा तितुका घोळवावा, सत्ताधर्म वाढवावा.. जय जिजाऊ!