Breaking News

भाजपमुळेच देशात अस्थिर वातावरण : शिंदे

 पुणे/प्रतिनिधी । 22 - देशात विविध आश्‍वासने देवून भाजपा सत्तारूढ झाले, मात्र या अपेक्षेचे ओझे भाजपला काही पेलवले नाही, त्यामुळेच सत्ता स्थापल्यापासून देशात अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या दोन वर्षात मोदींनी जनतेला दिलेले एकही अश्‍वासन पूर्ण केले नसून, यातच भाजपचे अपयश स्पष्ट दिसत आहे, असा घणाघाती आरोप माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी रविवारी येथे केला. आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.  
या वेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार, हर्षवर्धन पाटील, काँगेसचे शहराध्यक्ष अभय छाजेड व माजी आमदार दिप्ती चवधरी आदी उपस्थित होत्या.शिंदे यावेळी म्हणाले की , संपुआच्या काळात माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांनी देशात शांतता निर्माण केली होती. तसेच देशाच्या सीमा चांगल्याप्रकारे बळकट झाल्या होत्या. पण, सध्या भाजपमुळे देशात अशांतता निर्माण झाली आहे. देशात जे अनुचित प्रकार घडत आहेत, त्यावर भाजपचे नियंत्रणच नाही ही देशासमोर एक मोठी समस्या असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.गुजरातमध्ये पटेल समाजाचे आंदोलन, हैदराबाद येथील विद्यार्थ्याची आत्महत्या व जेएनयु प्रकरण,तेथे राहूल गांधी भेटायला गेले तर लगेच त्यांच्यावर भाजपकडून आरोप करण्यात येत असून, हे एक प्रकारे देशात सुडाचे राजकारण सुरू असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. 
जम्मू-काश्मीरमध्ये थेट जवानांच्या गाडीवरच गोळीबार करण्यात आला त्यावेळी भाजपचे गुप्त विभाग काय करत होते. देशातील सरहद्दी व अंतर्गत सुरक्षा देखील बळकट करण्यात सरकारला अपयश असून, एकप्रकारे बेफिकीरीने सरकार चालवत आहेत. अनेकवेळा विनंती करून देखील सरकार काँग्रेसबरोबर चर्चा करायला तयारच होत नाही. अशा चर्चांमुळे देशातील अनेक प्रश्‍न सहजपणे सुटतील हे मान्य करायला भाजप तयार नाही. दिल्लीच्या जेएनयुमध्ये जो अनुचित घटना घडली आहे. यावरूनच स्पष्ट होते की, भाजपला व त्यांची सहयोगी संस्था अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला आपले प्रस्थ निर्माण करायचे आहे. राहुल गांधी यांच्या गाडीवर लखनऊमध्ये दगडफेक करण्यात आली. या सगळ्यावरून स्पष्ट होते की, भाजपला हिटलरचे राज्य देशात प्रस्थापित करायचे आहे, असे शिंदे यांनी सांगितले.