शहरातील मनपाच्या जागांवर लागणार फलक - आयुक्त
परभणी, 15 - शहरातील महानगरपालिकेच्या मोकळ्या जागांवर तत्काळ फलक लावण्याचे आदेश महानगरपालिकेचे आयुक्त राहुल रेखावार यांनी शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत मनपाच्या नगररचना, मालमत्ता व रेकॉर्ड विभागाला दिले. त्यामुळे मनपाच्या नेमक्या जागा कोणत्या? त्यावर अतिक्रमणे कोणाची? हे स्पष्ट होणार आहे.
महानगरपालिकेच्या शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत लांबलेल्या सर्वसाधारण सभेत तत्कालीन नगरपालिकेने विविध प्रयोजनासाठी आरक्षित केलेल्या जागांचा मुद्दा नगररचना विभागाने पुन्हा एकदा सादर केला. नगरपरिषदेने शहरातील नाझ टॉकीजजवळ असलेली, नांदखेडा रस्ता व दर्गा रोडवरील खासगी जागा विकास योजनेअंतर्गत आरक्षित केली होती; परंतु त्या जागेचा विकास न झाल्यामुळे संबंधित जमिनीच्या मूळ मालकांनी मनपाला नोटीस बजावली आहे. त्यानंतर 12 महिन्यांच्या आत कारवाई होऊन खरेदीची प्रक्रिया होणे गरजेचे आहे. त्यातही दहा महिने गेले असून उर्वरित दोन महिन्यांत सभेने ठोस निर्णय घेण्याची मागणी व टीडीआरचा प्रस्ताव सादर करण्याची सूचना नगररचना विभागाने केली होती.
त्यानुसार टीडीआर करण्याचा निर्णय सभेने घेतला. या वेळी सदस्य विजय जामकर यांनी नेमक्या कोणत्या जागा आहेत, याची माहिती द्यावी, हसीबुर रहेमान यांनी त्या जागा खरेदी करावी, डॉ. विवेक नावंदर यांनी एकदा घेतलेली जागा कायम राहिली पाहिजे, तर ऍड. कादर यांनी त्या जागेवर मॉल उभारले जावेत अशी अपेक्षा व्यक्त केली. नगरसेवक गुलमीरखान यांनी मनपाच्या जागांवर फलक लावण्याची मागणी केली. शहरात मनपाच्या अनेक ठिकाणी मोकळ्या जागा असून, बहुतांश जागा अतिक्रमणांच्या विळख्यात आहेत.