सातार्यात हरित औद्योगिक वसाहतीसाठी मासकडून सकारात्मक पाऊल : मुद्गल
सातारा, 09 - स्वच्छ व हरित औद्योगिक वसाहत करण्यासाठी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने (मास) सकारात्मकतेने पाऊल उचलले आहे. अशा योजना दीर्घकालीन राबविल्यास त्याचे निश्चितच चांगले परिणाम दिसतील. त्यासाठी मासला शासनाचे सर्वतोपरी सहकार्य उपलब्ध केले जाईल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी दिली.
मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ सातारच्या ग्रीन मास उपक्रमास जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ केला. यानंतर मास भवनातील सर धनजीशा कूपर सभागृहात झालेल्या कार्यक्रमात मुद्गल बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रवी साळुंखे, मासचे अध्यक्ष दिलीप उतकूर, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी बाबासाहेब कुकडे, ग्रीन मास कमिटीचे अध्यक्ष उमेश मुंदडा, समर्थनगरच्या सरपंच अंजली देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
मुद्गल म्हणाले, औद्योगिक विकास महामंडळ, प्रदूषण नियंत्रण मंडळ व मॅन्युफॅक्चरर्स आसोसिएशन ऑफ सातारा यांनी एक समिती स्थापन करुन आणखी कोणत्या चांगल्या सेवा व उपाय करता येतील याचा अभ्यास करावा. त्यादृष्टीने पावले उचलावीत. सध्या प्रदूषणाचे प्रमाण वाढत आहे. त्यातच कचरा गोळा करणे व त्याची विल्हेवाट लावणे ही दोन्ही कामे अवघड होत आहेत. मात्र तेथेही सकारात्मकता दाखविल्यास कचर्यापासून उपयुक्त वस्तूंची निर्मिती करण्यावर भर दिला पाहिजे.
रवी साळुंखे म्हणाले, मासच्या या उपक्रमात जिल्हा परिषदेचे सर्व सहकार्य दिले जाईल. दिलीप उतकूर यांनी ग्रीन मास या संकल्पनेची माहिती दिली. उमेश मुंदडा यांनी ग्रीन मास योजनेतील चार टप्प्यांची माहिती दिली. मासचे सचिव जयंत महाजन यांनी सूत्रसंचालन केले. सागर बंड यांनी आभार मानले.