लोखंडी सळई डोक्यात आरपार घुसूनही ‘तो’ बचावला!
मुंबई, प्रतिनिधी, दि. 21 - सात फुटांची लोखंडी सळई डोक्यात आरपार घुसूनही एक मजूर बचावल्याची आश्चर्यकारक घटना मुंबईत घडली आहे. मालाडच्या तानाजीनगरमधील एका कन्स्ट्रक्शन साईटवर 24 वर्षीय मोहम्मद गुड्डू सिमेंट एकत्र करण्याचं काम करत असताना हा प्रकार घडला.
चौथ्या मजल्यावरुन पडलेली एक लोखंडी सळई थेट त्याच्या डोक्यावर आदळली आणि त्याच्या कवटच्या आरपार घुसली. या घटनेनंतर गुड्डूला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पाच तासांच्या शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांनी त्याला आश्चर्यकारकरित्या वाचवलं. महत्त्वाचं म्हणजे ही सळई डोक्याच्या आरपार घुसूनही गुड्डूच्या मेंदूची प्रमुख धमनीला कोणतंही नुकसान झालेलं नाही. पण गुड्डूच्या शरीराच्या डाव्या भागाला पक्षाघात झाला आहे. पण तीन महिन्यात त्याच्या सुधारणा होईल, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. या घटनेनंतर गुड्डूच्या डोक्याच्या उजव्या बाजूला दुखापत झाली होती.
रविवारी मालाड पश्चिमच्या तानाजीनगरमधील एका कन्स्ट्रक्शन साईटवर गुड्डू सिमेंट मिक्स करण्याचं काम करत होता. मात्र त्याचवेळी चौथ्या मजल्यावरुन सात फुटांची लोखंडी सळई थेट त्याच्या डोक्यावर आदळून आरपार घुसली. गुड्डूला तातडीने संजिवनी रुग्णालय आणि त्यानंतर सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सायन रुग्णालयात डॉ. बटुक दियोरा यांच्या नेतृत्त्वात डॉक्टरांच्या एका टीम त्याच्यावर शस्त्रक्रिया केली.हा खरंच एक चमत्कार आहे. एवढी मोठी दुखापत होऊनही तो वाचला. तो शुद्धीवर होता कारण सळई त्याच्या मेंदूच्या त्या भागातून आरपार झाली होती, ज्याला आपण सेफ पॅसेज म्हणतो. रुग्णाच्या ब्रेनस्टेमला नुकसान झालेलं नव्हतं आणि मेंदूला रक्त पोहोचवणार्या धमन्याही सुरक्षित होत्या.दियोरा आणि त्यांच्या टीमने सळई बाहेर काढण्यासाठी गुड्डूची कवटी उघडली. सळई काढण्यासाठी फार वेळ लागला, कारण यावेळी गुड्डूच्या दृष्टी जाण्याचा धोका होता. ही खूपच गुंतागुंतीची शस्त्रक्रिया होती. रक्तस्राव कमी व्हावा, यासाठी आमचा प्रयत्न सुरु होता. डॉक्टरांच्या माहितीनुसार, गुड्डूला कमीत कमी दोन आठवडे रुग्णालयातच राहावं लागेल. त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. पण त्याला पूर्णत: बरं होण्यासाठी तीन महिने लागू शकतात.