Breaking News

शिवराय शेतकर्‍यांचे राजे होते ः ना.तुपकर

  बुलडाणा (प्रतिनिधी)। 21 - छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ प्राचिन असला तरी त्याकाळी शेतकरी सुखी होता. स्वराज्यात शिवाजी महाराजांनी शेतकर्‍यांना सवलती दिल्या, जमिनी दिल्या व कर्जही दिले. त्यामुळे शिवराय हेच एकमेव शेतकर्‍यांचे राजे होते. आज होणार्‍या आत्महत्या ह्या लांछनास्पद असून आज पुन्हा शिवविचारांची गरज आहे. असे प्रतिपादन ना.रविकांत तुपकरांनी केले. आज दि.19 फेब्रुवारी रोजी रुईखेड टेकाळे येथे ते बोलत होते. 
बुलडाणा तालुक्यातील रुईखेड टेकाळे व सव येथील शिवजयंती कार्यक्रमात वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष ना.रविकांत तुपकर यांचे हस्ते शिवपुजन करण्यात आले. यावेळी तरुणांना व उपस्थित गावकर्‍यांना मार्गदर्शन करतांना ना.तुपकर म्हणाले की, छत्रपती शिवाजी राज्यांच्या काळातही दुष्काळ पडला होता. परंतू त्या भिषण दुष्काळातही सामान्य शेतकरी कंबरेला तलवार खेचून शिवरायांसोबत स्वराज्याची लढाई लढत राहिला. परंतू त्या काळात शेतकर्‍यानी आत्महत्या केली नाही. आज दुष्काळाचे शेतकरी आत्महत्या करतोय ही राज्यकर्त्यांसहित समाजातील सर्वच घटकांना चिंतन करायला लावणारी बाब आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे कोण्या जातीधर्माचे नसून ते शेतकर्‍यांचे व कष्टकर्‍यांचे राजे होते. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना कोणीही प्रायव्हेट लिमिटेड करण्याचा प्रयत्न करु नये. छत्रपती शिवाजी राजे हा फक्त वाचण्याचा व जिंदाबाद करण्याचा विषय नसून छत्रपती शिवाजी महाराज हा जगण्याचा विषय आहे. त्यामुळे छत्रपतींच्या स्वप्नातील राज्य निर्माण करायचे असेल तर शेतकर्‍यांच्या तरुण पोरांना पुन्हा एकदा संघटीत होवून लढण्याची गरज आहे. असेही ते यावेळी बोलतांना म्हणाले.