राष्ट्रीय महामार्गावरील साडेचौदा लाखाच्या चोरीचा गुन्ह्याचा पर्दाफाश; एकास अटक
सातारा, 10 - पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील बोरगावच्या हद्दीत ढाब्यावरून 14 लाख 50 हजार रुपये किमतीचे सोने-चांदी असलेली बॅग चोरून नेल्याचा गुन्हा बोरगाव पोलिसांनी उघडकिस आणला आहे. याप्रकरणी पुण्याच्या प्रविण प्रदीप कोेकरे-जाधव (वय 31, रा. काळेवाडी, पिंपरी, पुणे) यास अटक करण्यात आली असून त्याच्याकडून साडेतीन लाख रुपयाची चांदी जप्त करण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी की, राजेंद्र बोबडे हे आजरा-मुंबई या एसटीमधून 14 लाख 50 हजार रुपये किमतीचे दागिने घेऊन मुंबईला निघाले होते. रात्रीच्या सुमारास एसटी महामार्गावरील बोरगाव येथे सीमरनजित ढाब्यावर थांबले होते. एसटीतील प्रवाशी जेवण करण्यासाठी गेल्यानंतर अज्ञाताने ही संधी साधून दागिन्यांच्या बॅगा चोरून नेल्या होत्या. गेल्या आठ दिवसापासून बोरगाव पोलीस तपास करत होते. दरम्यान, या चोरीमध्ये पाच जणांचा सहभाग असल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे. संशयितांमध्ये सातारा जिल्ह्यातील एकजण असावा, असेही समोर येत आहेत.