शिवजयंतीनिमित्त सातारा जिल्ह्यात कलम 36 लागू
सातारा, 10 - सातारा जिल्ह्यात दि. 19 फेब्रुवारी रोजी शासनाच्यावतीने शिवजयंती उत्सव साजरा होत असून या निमित्ताने मिरवणूका काढण्यात येत असल्याने कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने बंदोबस्तासाठी नेमलेल्या सर्व पोलीस अधिकारी व त्यांच्यापेक्षा वरिष्ठ पोलीस अधिकार्यांना ’मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 36’ नुसार आवश्यक ते अधिकार प्रदान करण्यात आले आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिली.
जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकार्यांना 19 फेब्रुवारी रोजी हे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. त्यानुसार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जनतेचे स्वास्थ्य, सुरक्षा आणि कायदा व सुव्यवस्था अबाधीत ठेवण्याचे निर्देश देणे, मिरवणुकीच्या मार्गावरील वाहतुकीचे नियमन करणे, मिरवणुकीतील सहभागी लोकांचे वर्तन, ध्वनिप्रदूषणासंबंधाने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार निर्बंधांचे पालन व्हावे व ध्वनिक्षेपकांचा वापर योग्य प्रकारे व्हावा यासंबंधीचे निर्देश देण्यासंदर्भातील अधिकार आहेत. याची नोंद घ्यावी, असे आवाहन डॉ. देशमुख यांनी केले आहे.