Breaking News

सत्ता शिवसेना-भाजपच्या डोक्यात गेली -शरद पवार

मुंबई, 28 - सत्ता येते आणि जाते पण ती सत्ता डोक्यात जाऊ देऊ नका, असा सल्ला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी शिवसेना-भाजपला दिला आहे. मुंबईमध्ये आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात पवार बोलत होते. सत्ता शिवसेना भाजपच्या डोक्यात गेली आहे, अशी घणाघाती टीकाही शरद पवारांनी सेना-भाजपवर केली. 
पानगावला पोलीस अधिकार्‍यावर हल्ला झाला. हे बरोबर नाही. ठाण्यातही महिला पोलीसावर हल्ला झाला, असे म्हणत शरद पवारांनी पोलिसांवर वाढत्या हल्ल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. समाजात अस्वस्थता आहे. विशिष्ट लोकांवर लक्ष्य केंद्रित करून काही गोष्टी सुरू आहेत. सत्तेच्या आधारावर वेगळ्या विचारांच्या लोकांना संपवायचे काम सुरु आहे. रोहित वेमुलाच्या हत्येवरुनही पवारांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. जेएनयूमध्ये काय चललेय असा सवालही यानिमित्ताने पवारांनी उपस्थित केला.
बिल्डर सुरज परमार आत्महत्या प्रकरणात आमचा माणूस दोषी असेल, तर मी पाठीशी घालणार नाही. पण परमार यांनी लिहीलेले पत्र सांगतेय की परमार आर्थिक अडचणीत होते म्हणून त्यांनी आत्महत्या केली. परमार यांच्या चुकीच्या गोष्टींवर आमच्या नगरसेवकांनी बोट ठेवले, तर त्यांना दोषी ठरवून तुरूंगात डांबले जाते हे सूडाचे राजकारण आहे, असे परमार प्रकरणावर बोलताना पवार म्हणाले.