कन्हैय्या कुमारचा देशविरोधी घोषणांचा व्हिडिओ नाही; दिल्ली पोलिसांची उच्च न्यायालयात माहिती
नवी दिल्ली, 01 - जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैय्या कुमार देशविरोधी घोषणा देत असतानाचा व्हिडिओ उपलब्ध नसल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिल्ली उच्च न्यायालयात सोमवारी दिली.
कन्हैय्याविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांच्या ताब्यात असलेला कन्हैय्या कुमारने जामीनासाठी अर्ज केला आहे. या प्रकरणाची दिल्ली उच्च न्यायालयासमोर सोमवारी सुनावणी झाली. दरम्यान न्यायाधीश प्रतिमा राणी यांनी या प्रकरणी दिल्ली पोलिसांकडून माहिती मागवली. कन्हैय्या देशविरोधी घोषणा देत असल्याचा व्हिडिओ आहे का?‘ असा प्रश्न न्यायालयाने अतिरिक्त महाधिवक्ता तुषार मेहता यांना विचारला. त्यावर दिल्ली पोलिसांच्या वतीने उत्तर देताना मेहता यांनी अशाप्रकारचा व्हिडिओ उपलब्ध नसल्याचे सांगितले. त्यावर न्यायालयाने दिल्ली पोलिसांना फटकारले. तसेच ज्यावेळी देशविरोधी घोषणा देण्यात येत होत्या त्यावेळी तेथे खाजगी वेशात हजर असलेल्या तीन पोलिस अधिकार्यांनी काही कारवाई का नाही केली, अशी विचारणाही केली. तसेच कन्हैय्या कुमारच्या जामीनावर सुनावणी 2 मार्चपर्यंत लांबणीवर टाकला.