आरफळमध्ये अवतरले बर्ड ऑफ पॅराडाईज
सातारा, 09 - केसरी रंगाचा तुरा . . . . जांभळी आणि काहीशी हिरवट उघडलेली चोच. . . लालसर रंगाची ऐटदार मान. . . हिरव्या रंगाच्या डोहात बकध्यानासारखे भासणारे आणि आकर्षित करणारे हे वर्णन बर्ड ऑफ पॅराडाईज या फुलाचे आहे. सातारा तालुक्यातील आरफळ येथील रवींद्र शंकर पवार या शेतकर्यांने खरोखरच नंदनवन फुलवले आहे. गेल्या पंधरा वर्षापासून याच नंदनवनापासून ते वर्षाला साडेतीन लाखांचे उत्पन्न घेत आहे.
2001 साली रवींद्रचे वडील कै. शंकर पवार यांनी सातारा जिल्ह्यात सर्वप्रथम बेंगलोर येथील नर्सरीतून रोपे आणून पाऊण एकरात बर्ड ऑफ पॅराडाईजची झाडे 5 बाय 5 अंतरावर लावली. त्यानंतर रवींद्र यांनीही याचा विस्तार करीत आणखी पाऊण एकरामध्ये 5 बाय 6 अंतरावर लावली. 2 बाय 2 चा खड्डा घेऊन त्यामध्ये मुरुम, लालमाती, शेणखत घालून या खड्ड्यांमध्ये ही रोपे लावण्यात आली. कृषी विभागाच्या माध्यमातून ठिबकचे अनुदान घेऊन ही शेती त्यांनी ठिबकवर केली. लागवडीचा खर्च एक लाख रुपये आला. या बागेत त्यांनी सुरुवातला झेंडु, आले अशी आंतरपिके घेतली. रोपे लावल्यानंतर प्रत्यक्षात चार वर्षानंतर उत्पन्नाला सुरुवात झाली. लग्न सराईच्या हंगामात या फुलांना खुप मोठी मागणी असते. जास्तीत जास्त 25 रुपयाला 1 तर कमीत कमी 15 रुपयाला 1 या भावाप्रमाणे फुलांना दर मिळत आहे. यातून महिन्याला 25 ते 35 हजार आणि वर्षाला अंदाजे साडेतीन लाखांचे उत्पन्न मिळत असल्याची माहिती रवींद्र पवार यांनी दिली. ते म्हणाले, रोपांची लागवड झाल्यापासून प्रत्यक्षात उत्पन्नाचा काळ हा सुमारे 4 वर्षाचा आहे. यामध्ये आंतरपिके घेऊन हा खर्च भागविला जाऊ शकतो. परंतू एकदा उत्पन्न सुरु झाले तर ते किमान 25 वर्षे सुरु राहते. आणि या बागेचा
फायदा म्हणजे याला कोणत्याही रोगाचा प्रादुर्भाव होत नाही. त्यामुळे औषधाचा खर्च नाही. या बागेला गांडुळ खत, कृषी लक्ष्मी, ग्रीन हार्वेस्ट अशी सेंद्रीय खते दिली जातात. जेवढी जास्त सेंद्रीय खते देऊ तितकी सुंदर आकर्षक फुलांचे उत्पन्न मिळते. परिणामी दरही चांगला मिळतो. सद्या पुण्याला गुलटेकडीला ही फुले आम्ही पाठवतो. सोमवार, बुधवार आणि शनिवार अशी आठवड्यातून तीन वेळा या फुलांची तोडणी होते. त्यानंतर समान उंचीचे छाटणी झालेले ही फुले 10-10 च्या संख्येने पॅकींग करुन बाजारपेठेत पाठविण्यात येतात. हे
फुल बुके बनविण्यासाठी, लग्न समारंभ, विविध सोहळ्यात सजावटींसाठी मोठ्या प्रमाणात वापरतात. आकर्षक रंगसंगती आणि पक्षाच्या आकारातील आरफळ येथील ही मोहक फुलांची शेती पाहिल्यावर जणु पक्षांचे नंदनवनच भासते आणि याकडे आपोअपच आपण आकर्षित होतो.