Breaking News

सावत्र भावाचा खून प्रकरणी तिघेजण पोलीस कोठडीत

उंब्रज, प्रतिनिधी 17 - ः प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून पाटण तालुक्यातील कोंजवडे येथे जावयाच्या सावत्र भावाचा खून केल्याप्रकरणी उंब्रज पोलिसांनी अटक केलेल्या तिघांची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली. 
दाजीराम नामदेव पवार (वय 45, रा. कोंजवडे) यांचा खून करण्यात आला होता. अमृत दिनकर भोसले, शांताबाई दिनकर भोसले व रुक्मिणी किसन भोसले (सर्व रा. सावरघर, ता. पाटण), अशी पोलिसांनी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.  अधिक नामदेव पवार (वय 30, रा. कोंजवडे) हे शनिवारी (दि. 13) रोजी रात्री 9 च्या सुमारास कुटुंबीयांसमवेत घरात टी. व्ही. पहात असताना त्यांचा चुलत सासरा अमृत दिनकर भोसले, चुलत सासू शांताबाई व रुक्मिणी किसन भोसले हे अचानक घरात घुसले. त्यांनी पवार कुटुंबीयांना शिवीगाळ करत अधिक पवार यांची पत्नी सौ. पूजा हिस लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. ही भांडणे सोडविण्यास अधिक पवार व त्यांचा सावत्र भाऊ  दाजीराम हे गेले असता अमृत भोसले यांनी अधिक व दाजीराम यांच्यावर गुप्तीने वार केले. त्यामध्ये अधिक हा किरकोळ जखमी झाला तर दाजीराम याच्या दंडावर व छातीवर गुप्तीचे गंभीर वार झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. 
या खून प्रकरणी उंब्रजचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एम. के. पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन संशयितांचा शोध घेतला. पोलिसांनी तिन्ही संशयितांना अटक केली असून सपोनि. पाटील तपास करत आहेत.