शाहूनगर-गोडोली त्रिशंकू भागातील रस्त्यांसाठी भरघोस निधी
सातारा, प्रतिनिधी 17 - कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सामील नसल्याने सातारा शहरालगतच्या शाहूनगर, गोडोली, रामराव पवारनगर हा त्रिशंकु भाग विकासापासून वंचित रहात होता. मात्र आ. श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी हा त्रिशंकु भाग विकासाच्या प्रवाहात रहावा यासाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे.
या भागातील रस्ते, पाणी आणि वीज या मुलभूत सुविधांकडे जातीने लक्ष देणार्या शिवेंद्रसिंहराजे यांच्या आमदार फंडातून भागातील 8 रस्त्यांसाठी तब्बल 51 लाख 30 हजार रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून या रस्त्यांची कामे तातडीने मार्गी लागणार आहेत. शाहूनगर, रामरावपवार नगर, जगतापवाडी, गोळीबार मैदान, साई कॉलनी, त्रिमुर्ती कॉलनी, हिलटॉप सोसायटी, बीएसएनएल कॉलनी यासह छोट्या, मोठ्या सोसायट्या आणि कॉलनींचा समावेश त्रिशंकु भागामध्ये येतो. अगदी विसावा नाक्यापर्यंत विस्तारलेल्या भागात दिवसेंदिवस लोकवस्ती वाढत आहे. त्रिशंकु भाग असल्याने या भागाच्या विकासासाठी कोणत्याही प्रकारचा निधी उपलब्ध होत नाही. तरीही आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी विविध योजनांच्या माध्यमातून या भागाला मुलभूत सोयी-सुविधा पुरवण्यासाठी नेहमीच प्राधान्य दिले आहे. या भागातील काही मुख्य रस्त्यांच्या डांबरीकरणाचे
काम आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या पाठपुराव्यातून मार्गी लागले आहे तर, अंतर्गत रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी शिवेंद्रसिंहराजे यांनी 51 लाख 30 हजार रुपये निधी उपलब्ध करुन दिला आहे.
रामराव पवारनगर ते निसर्ग कॉलनी या परिसरातील रस्त्यासाठी 10 लाख 41 हजार रुपये, गुरुकृपा कॉलनीतील अंतर्गत रस्त्यांसाठी 6 लाख 59 हजार रुपये, साईबाबा हौसिंग सोसायटीतील अंतर्गत रस्त्यांसाठी 6 लाख 50 हजार रुपये, शिवप्रेमी कॉलनीतील अंतर्गत रस्त्यांसाठी 4 लाख 70 हजार रुपये, त्रिमुर्ती कॉलनीतील अंतर्गत रस्त्यांसाठी 4 लाख 49 हजार, हिलटॉप हौसिंग सोसायटीतील अंतर्गत रस्त्यांसाठी 3 लाख 84 हजार, श्रीधर कॉलनीतील अंतर्गत रस्त्यांसाठी 12 लाख 74 हजार आणि साई कॉलनीतील अंतर्गत रस्त्यांसाठी 2 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या सर्व रस्त्यांच्या कामांना तातडीने सुरुवात करुन कामे दर्जेदार करण्याच्या सुचना आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी संबंधित अधिकार्यांना दिल्या आहेत. त्रिशंकु भागातील सर्व समस्या सोडवण्यासाठी आपण नेहमीप्रमाणे कार्यरत असल्याचेही त्यांनी यानिमीत्ताने स्पष्ट केले आहे.