ग्रंथोत्सवांमधून साहित्य निर्मितीची प्रेरणा मिळते
बुलडाणा (प्रतिनिधी)। 16 - स्थानिक गर्दे सभागृहात बुलडाणा ग्रंथोत्सव 2016 चा शुभारंभ आज थाटात पार पडला. ग्रंथोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर प्रमुख उपस्थितीत ज्येष्ठ साहित्यिक सदानंद देशमुख, उद्घाटक म्हणून आमदार हर्षवर्धन सपकाळ, अध्यक्षस्थानी अप्पर जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे, उपजिल्हाधिकारी रमेश घेवंदे, माजी ग्रंथालय संचालक श्री. तायडे, ग्रंथालय संघाचे अध्यक्ष प्रा. कि. वा वाघ, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सतिष जाधव, निलेश तायडे आदी उपस्थीत होते.
सध्याचा काळ धकाधकीचा आहे. ग्रंथ वाचण्याची इच्छा असली, तरी ग्रंथ वाचायला वेळ मिळत नाही. मात्र, ग्रंथोत्सवांच्या माध्यमातून निश्चीतच विविध साहित्य समाजासमोर येते व वाचनाची आवड निर्माण होते. एवढेच नव्हे, तर साहित्यनिर्मितीचीही प्रेरणाही मिळते, असे प्रतिपादन यावेळी ज्येष्ठ साहित्यिक सदानंद देशमुख यांनी केले. विद्यार्थी देशाचे भविष्य असून त्यांनी अशाप्रकारच्या ग्रंथोत्सवामध्ये सहभागी व्हायला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करीत श्री. देशमुख पुढे म्हणाले, साहित्य वाचनातून विद्यार्थ्यांचे व्यक्तीमत्व प्रगल्भ होते. मात्र, सध्याच्या काळात वाचन संस्कृती लोप पावत आहे. वाचनाची आवडच नसल्यामुळे आगामी पिढी सव्यांग ज्ञानाला मुकणार आहे. त्यामुळे सामाजिक स्वास्थ्य टिकणार नाही, अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली. आमदार हर्षवर्धन सपकाळ विचार व्यक्त करताना म्हणाले, ग्रंथ हे नागरिकांच्या मनावर अधीराज्य गाजवितात. ग्रंथामुळेच समाज घडतो. ग्रंथाच्या सहवासाने संस्कारांची उधळण होत संस्कार रूजतात. वाचन संस्कृती वृद्धींगत करण्यासाठी ग्रंथोत्सवांचे आयोजन व्हायला पाहिजे. मनातील गढूळ विचार बाहेर काढण्यासाठी ग्रंथ वाचन महत्वाचे आहे. ग्रंथामधूनच विद्यार्थ्यांचे व्यक्तीमत्व घडणार आहे.
अप्पर जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे यावेळी म्हणाले, विचार मानवाला मोठे करतात. त्याकरिता सदृढ मन असणे आवश्यक आहे. कारण सदृढ मनामधूनच प्रगल्भ विचार बाहेर पडतात. अशा सुदृढ मनाला ग्रंथ हे रामबाण औषधासारखे काम करतात. त्यामुळे विद्यार्थी दशेतील प्रत्येकाने ग्रंथांना आपले मित्र करावे. खरा मनुष्य हा मानवतेमधूनच समाजाला दिसतो. मानवता टिकविण्यासाठीही ग्रंथ महत्वाची भूमिका बजावित असतात. तरी अशा ग्रंथोत्सवांमधून वाचन संस्कृती प्रबळ होवून समाजाचे मानसिक स्वास्थ्य टिकून राहील, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. प्रास्ताविकातून जिल्हा ग्रंथालय अधिकारी सतिष जाधव यांनी ग्रंथोत्सव आयोजनामागील भूमिका विषद केली.