Breaking News

8 सदस्यांच्या नियुक्तीसाठी महासभा बोलवा

 अहमदनगर । प्रतिनिधी । 01-  स्थायी समितीचे आठ सदस्य निवृत्त होऊन एक महिना होत आला तरी अद्यापही नवीन आठ सदस्यांच्या नियुक्तीसाठी महासभा बोलाविण्यात आली नाही. त्यामुळे महासभेचे तारीख कधी जाहिर होते, याकडे सदस्यांचे लक्ष लागले होते. सध्या आठ सदस्यांवर स्थायी समितीचा कारभार सुरु आहे. स्थायीत वर्णी लागण्यासाठी इच्छुकांनी लॉबिंग सुरु केले आहे. 
स्थायी समितीतील आठ सदस्यांची मुदत 1 फेब्रुवारीलाच संपली. संपत बारस्कर, मंगल गुंदेचा व कुमारी वाकळे (राष्ट्रवादीप्रणित शहर विकास आघाडी), सुनिता कांबळे, व दीप चव्हाण (कॉग्रेस), सचिन जाधव (शिवसेना अपक्ष आघाडी) व उषा ठाणगे (अपक्ष) हे 7 सदस्य निवृत्त झाले. अजिंक्य बोरकर अपात्र ठरल्याने त्यांचे सदस्यत्व यापुर्वीच रद्द झालेले आहे. आता अनिल बोरुडे, विद्या खैरे, छाया तिवारी (शिवसेना), श्रीपाद छिंदम, उषा नलावडे (भाजप), रुपाली वारे (काँग्रेस) व समद खान (राष्ट्रवादी) हे आठ सदस्य स्थायी समितीत आहे. मनसेच्या कोट्यातून संख्याबळानुसार फक्त एकच सदस्य समितीवर जाऊ शकतो. सत्ताधारी आघाडीतच समितीवर जाण्यासाठी जोरदार रस्सीखेच सुरु आल्याने, महासभेकडून मनसेचा सदस्य नियुक्त होण्याची शक्यता कमी आहे. सभापती गणेश भोसले निवृत्त होत नसल्याने, नवीन आठ सदस्य नियुक्त
ीमध्ये मनसेच्या अन्य सदस्यास पक्षाच्या कोट्यातून समितीवर जाण्याची संधी मिळणार नाही. त्यामुळे पक्षाच्या कोट्यातून मनसेच्या अन्य सदस्यास संधी देण्यासाठी सभापती गणेश भोसले यांनी समितीच्या सदस्यत्वाचा राजीनामा देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. निवृत्त झालेल्या आठ सदस्यांच्या जागी नवीन सदस्य नियुक्तीसाठी महासभा बोलविली जाणार आहे. या सभेची विषयपत्रिका निघण्यापुर्वी हा राजीनामा देणार असल्याची सभापती भोसले यांनी सांगितले आहे. 
भोसले यांचा राजीनामा देण्याचा निश्‍चय पक्का आहे. त्यातच त्यांच्या सभापतीपदाची मुदत 3 मार्च रोजी संपत आहे. मात्र, नवीन आठ सदस्य निवडून येऊन सभापतीपदाची निवड होत नाही तोपर्यंत ते सभापतीपदावर कायम राहणार आहेत. मात्र, दुसरीकडे सदस्य निवडीसाठी अद्यापही सभा बोलविण्याच्या हालचाली दिसत नसल्याने इच्छुकांत धाकधूक वाढली आहे. महासभा कधी निघते, याची अनेक जण वाट पाहत आहे. मनसेच्या वीणा बोज्जा व सुवर्णा जाधव या दोघी सभापतीपदाच्या दावेदार आहेत. 
यापैकी एकीला संधी मिळणार आहे. त्याच्यात कोणाला सभापती करायचे, याचा निर्णय झाला नाही. दोघीही सभापती होण्यासाठी इच्छुक असून, त्याच्यात स्पर्धा सुरु झाली आहे. दुसरीकडे अपक्ष नगरसेवकासह सत्ताधारी राष्ट्रवादी पक्षातील एका ज्येष्ठ नगरसेवकाने स्थायी सभापतीपदावर दावा सांगितला आहे. त्यादृष्टीने पक्षनेत्यांकडे फिल्डींग लावली आहे. 
जून महिन्यात नवीन महापौराची निवड होणार आहे. आघाडी व युतीने आतापासून जोरदार तयारी सुरु केली आहे. महापौरपदाच्या निवडणुकीत दगाफटका होऊ नये, याची काळजी सर्वजण घेत आहे. नगरसेवकांची नाराजी त्यांना परवडणार नसल्याने पुढचा अंदाज घेऊन स्थायी समितीत सदस्यांची निवड करताना काळजी घेतली जात आहे. पुढच्या महिन्यात अंदाजपत्रकाला मंजुरी देण्यासाठी महासभा बोलाविली जाणार आहे. या सभेतच स्थायी सदस्यांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे. गटनेत्यांनी बंद पाकिटात महापौरांकडे नावे सादर केल्यानंतर पीठासीन अधिकार्‍यांकडून सभेत ही नावे जाहिर करण्यात येणार आहेत.