लोकसेवा परिवारातर्फे अंगापूर-मुंबई पायी यात्रा
सातारा, प्रतिनिधी 17 - ग्रामीण भागात शिक्षण, पर्यावरण आणि ग्रामविकासात गेल्या दोन दशकापासून कार्यरत असलेल्या लोकसेवा परिवारातर्फे ग्रामीण शिक्षण व्यवस्थेत लोकसहभाग वाढवून ही व्यवस्था मजबुत व्हावी, आणि लोकजागृती व्हावी यासाठी अंगापूर ते मुंबई अशा 312 किलोमीटर रचनात्मक पायी यात्रेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती माणिक शेडगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
दि. 21 फेब्रुवारीपासून अंगापूर येथून या यात्रेला सुरुवात होणार असून दि. 8 मार्च रोजी मुंबई येथे समारोप होणार आहे. ही पदयात्रा असून अंगापूर ते मुंबई या मार्गावरील 100 गावामधील 100 शाळामध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. 14 दिवसाचे मुक्काम असलेली ही यात्रा ग्रामीण शिक्षण व्यवस्थेत लोकसहभाग वाढावा, यासाठी काढण्यात येणार आहे. लोकसहभाग वाढविण्यासाठी सहा कलमी कार्यक्रम तयार करण्यात आला आहे.