पंकज भुजबळांना दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार
मुंबई, 01 -भुजबळ कुटुंबीयांच्या अडचणी कमी होण्याचं नावच घेत नाही. आता एमईटी घोटाळा प्रकरणी पंकज भुजबळ यांना दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. सुनील कर्वे यांनी केलेल्या एमईटी घोटाळा तक्रारी संदर्भात धर्मादाय आयुक्तांकडे चौकशी करता हजर राहण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे.
मुंबई एज्युकेशन ट्रस्टमधील 187 कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी आमदार पंकज भुजबळ यांच्याविरोधात येत्या सोमवारपर्यंत वॉरंट काढू नका तसंच याची सुनावणी घेऊ नका, असे आदेश उच्च न्यायालयाने शुक्रवारी धर्मादाय आयुक्तांना दिले होते.ट्रस्टमध्ये हा घोटाळा झाल्यानंतर विश्वस्त सुनील कर्वे यांनी 2012 रोजी माजी सावर्जनिक बांधकाम मंत्री आणि ट्रस्टचे प्रमुख छगन भुजबळांना नेाटीस पाठवली आहे. त्यानंतर कर्वे यांनाच पदावरुन काढून टाकण्यात आले. त्याविरोधात कर्वे यांनी धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार दाखल केली. यावर सुनावणी होत नसल्याने कर्वे यांनी न्यायालयाचे दार ठोठावले.
न्यायालयाने या तक्रारीवर तातडीने सुनावणी घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार आयुक्तांनी समीर भुजबळ यांना खटल्यासाठी हजर राहण्याचे समन्स बजावले. समीर यांना ईडीने अटक केल्याने ते या खटल्यासाठी हजर राहू शकले नाही. त्यामुळे कर्वे यांनी स्वतंत्र अर्ज करून छगन भुजबळ अथवा पंकज यांना हजर राहण्याचे आदेश जारी करावेत, अशी मागणी आयुक्तांकडे केली आहे.