Breaking News

रायगडाची पवित्र माती मातृतिर्थावर दाखल

  बुलडाणा (प्रतिनिधी)। 16 -  जिजाऊंचे जन्मस्थळ म्हणून मातृतिर्थ बुलडाणा जिल्ह्याकडे पाहिले जाते. तर स्वराज्याचा राज्यशकट जेथून चालला तो सर्वोच्च मनबिंदू शिवरायांची कर्मभूमि म्हणून किल्ले रायगडाकडे पाहिले जाते. रायगड आणि मातृतिर्थाचे नाते हे ऐतिहासिक आहे. 
मातृतिर्थ बुलडाण्यामध्ये ‘न भूतो न भविष्यती’ असा शिवजयंती उत्सव सोहळा साजरा करण्याचे योजले आहे. त्याचाच एक भाग म्हणून शिवछत्रपतींच्या पावन स्पर्शाने पुणीत झालेली पवित्र रायगडाची माती मातृतिर्थ बुलडाण्यामध्ये आणल्या गेली आहे. शिवरायांचा सच्चा मावळा राहूल नारडीया आणि त्याच्या सहकार्‍यांनी हा मातीरुपी कलश बुलडाण्यात आणला आहे. ही माती बुलडाणेकरांनी भाळी लावावी असे आवाहन सार्वजनीक उत्सव समितीच्या वतीने 
करण्यात आले आहे. 
19 फेब्रुवारी रोजी साजर्‍या होणार्‍या शिवजयंतीची तयारी अंतिम टप्प्यात असून तयारीसाठी उत्सव समितीसह सर्वच समित्यांचे पदाधिकारी झटत आहेत. उत्सव सोहळ्यात विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले आहे. सिंदखेड राजा येथून जिजाऊंची मशाल यानिमित्ताने बुलडाणा शहरात दाखल होत आहे. तसेच शिवरायांची वेशभूषा साकारणारे तरुण मोठ्या प्रमाणात सहभागी होणार आहे. शिवरायांच्या पदस्पर्शाने पुणीत झालेली रायगडाची माती यानिमित्ताने मानवंदनेसाठी जिजामाता क्रिडा संकूल येथे ठेवण्यात आली असून सर्व बुलडाणेकरांनी ही माती भाळी लावून शिवरायांप्रती आदरांजली व्यक्त करावी असे आवाहन शिवजयंती उत्सव समितीने केले आहे. शिवरायंची वेशभूषा साकारणार लहान मुले व तरुणांनी 
शिवरायांच्या पोशाखासाठी आठवडी बाजारातील संचेती ड्रेसेस येथे संपर्क करावा असे समितीने कळविले आहे.