चौकशीला घाबरत नाही, सोमैया फेम षड्यंत्राला पुरून उरणार ; भुजबळांची डरकाळी समर्थकांची आरोळी अभियंत्यांना पळता भुई
मुंबई, प्रतिनिधी - 09 -आमच्यावर असलेले आरोप हे चुकीचे आहेत. मी कोणतेही चुकीचे काम केले नाही. महाराष्ट्र सदन बांधकामात भुजबळ कुटुंबियांवर असलेले आरोप हे बिनबुडाचे आहेत. येणा-या काही दिवसात आम्ही निर्दोष असल्याचे स्पष्ट होईल, असे मत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत मांडले. या प्रकरणाचा किरीट सोमय्यांनी चुकीचा प्रचार केल्याचे ते म्हणाले. मुंबईत पोहचल्यानंतर दुपारनंतर भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेऊन सर्व आरोप फेटाळले आहेत.
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचे आज दुपारी दोनच्या सुमारास मुंबईतील सहारा एअरपोर्टवर आगमन झाले. त्यांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व समर्थकांनी उपस्थित राहून जोरदार शक्तीप्रदर्शन करीत त्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केल्या. शक्तीप्रदर्शन करण्यासाठी कार्यकर्त्यांनी विमानतळावर उपस्थित राहावे यासाठी सोमवारपासूनच संदेश व्हॉटस्अॅपसह सोशल मिडियातून व्हायरल झाले होते. त्यामुळे भुजबळ यांच्याविरोधात सुरू असलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर समर्थकांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत सरकारकडे इशारा दिला आहे. विशेष म्हणजे, संदेशापुढे दंड बेंडकोळी फुगावलेले चिन्हही टाकल्यामुळे थेट भाजप सरकारला एकप्रकारे आव्हानही दिल्याची चर्चा आहे. समर्थकांना उद्देशून भुजबळ म्हणाले, मी कोणतेही चूक केलेली नाही. त्यामुळे मी कोणालाही घाबरत नाही. मात्र आपल्याकडून कायदा-सुव्यवस्था मोडणार नाही याची काळजी घ्या. शांतता राखा व संयमाने वागा असे भुजबळांनी सांगत त्यांचे आभार मानले.
माजी खासदार समीर भुजबळ यांना ईडीने अटक केल्यानंतर आमदार पंकज भुजबळ छगन भुजबळ या पितापुत्राला अटक होईल असे संकेत मिळत आहेत. आज सकाळपासूनच पंकज भुजबळ यांची ईडीने उलटतपासणी व चौकशी सुरु केली आहे. भुजबळ यांच्याविरोधातील कारवाई भाजप सरकारकडून हेतुपुरस्सर केली जात असून, त्याला उत्तर देण्यासाठी राष्ट्रवादीने हिंसक आंदोलन केले होते. त्यात भुजबळ यांना अमेरिकेतून परतल्यानंतर विमानतळावरच अटक होईल अशीही चर्चा होती. या सर्व पार्श्वभूमीवर आज दुपारी भुजबळ हे मुंबईत दाखल झाले आहेत. त्यांचे दमदार स्वागत करून पाठिंबा दिला व संभाव्य कारवाईविरोधात दडपण निर्माण करणे अशा उद्देशातून शक्तिप्रदर्शनाची शक्कल लढवली गेल्याचे सांगितले जाते. त्यातून राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ पदाधिका-यांच्या नावाने भुजबळ यांच्या स्वागतासाठी सहारा एअरपोर्ट येथे कार्यकर्त्यांनी जमावे असा संदेश व्हायरल झाला होता. दरम्यान, भुजबळ यांच्यासाठी होणार्या संभाव्य शक्तिप्रदर्शनाला ब्रेक लावण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली होती. त्यातून राष्ट्रवादीतील काही आक्रमक पदाधिकार्यांवर पोलिसांची काही दिवस नजर असणार आहे.
अभियंत्यांची नावे जाहीर करणार
छगन भुजबळ यांनी मुंबईत पाऊल ठेवताच समता कार्यकर्त्यांना उधाण आले असून त्यांचे निर्दोषत्व सिध्द करण्यासाठी कार्यकर्त्यांमध्येच चढाओढ सुरू झाल्याचे दिसत आहे. दरम्यान सत्यशोधक माळी सेवा संघानेही छगन भुजबळ आणि परिवार दोषी नसल्याबाबत सावधपणे प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.सत्यशोधक माळी सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष आ. अॅड. बी.एन.होले यांनी फडणवीस सरकारच्या कारवाईचा स्पष्ट शब्दात निषेध केला आहे. भुजबळांना सुळावर देऊन अभियंत्यांना वाचविण्याचा प्रकार समाज सहन करणार नाही. येत्या एक दोन दिवसांत साबांतील विविध प्रकारचे घोटाळे उघड करून माया जमविणार्या अभियंत्यांची नावे जाहीर करणार असल्याचेही त्यांनी सांगीतले.
भुजबळ उवाच...
जातीय आकसातून ही कारवाई झाली असे मी कधी म्हटलेच नाही.
ईडीला आम्ही स्वत: पत्र पाठवून चौकशीसाठी तयार असल्याचे सांगितलं, मग अटक का? सर्व निर्णय मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आले. कामाच्या फाईल अनेक विभागांनी तपासल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्याला मंजुरी दिली. आम्ही एसीबीच्या चौकशीला पूर्ण सहकार्य केले, कोणतेही चुकीचे काम केले नाही. स्वत:हून कोणतेही निर्णय घेतलेले नाहीत, कुठेही भ्रष्टाचार झालेला नाही. मी पळ काढल्याचे वृत्त साफ खोटे आहे. 25 नोव्हेंबरला मला अमेरिकेचे निमंत्रण होते. पळून जाण्याचा काही प्रश्नच नव्हता. चौकशीला मी सामोरे गेलो. मी वॉशिंग्टनला गेल्यानंतर भुजबळ पळून गेल्याची चर्चा सुरु झाली. अमेरिका दौरा हा पुर्वनियोजित होता, शरद पवारांना या दौर्याची कल्पना होती.