Breaking News

अर्जदारांचे 95 कोटी आठवडाभरात देणार

मुंबई, प्रतिनिधी, दि. 28 - म्हाडा कोकण मंडळाच्या सोडतीतील घर न लागलेल्या सव्वा लाखांहून अधिक अर्जदारांना पुढील आठवड्यात अनामत रक्कम परत केली जाणार आहे. ही रक्कम 95 कोटी आहे. 
सोडतीत नाव न आलेल्या अर्जदारांना अनामत परत करण्याच्या सूचना बँकेला दिल्याची माहिती म्हाडाचे मुख्याधिकारी विजय लहाने यांनी काल दिली. चार हजार 275 घरांसाठी एक लाख 34 हजार जणांनी अर्ज केले होते. अर्जदारांकडून पाच हजारांपासून 15 हजारांपर्यंत अनामत रक्कम घेण्यात आली होती. त्यापोटी म्हाडाकडे 103 कोटी 73 लाख 31 हजार 900 रुपये जमा झाले आहेत. विजेत्यांची अनामत रक्कम आणि अर्जाचे शुल्क वगळून अपयशी अर्जदारांची 95 कोटींची अनामत परत करण्यात येणार आहे. अनामत परत करण्याबाबत कालच बँकेला पत्र पाठविण्यात आले आहे. पुढील आठवडाभरात ते पैसे अर्जदाराच्या बँक खात्यात जमा केले जातील. 
पणन विभागाची निर्मिती : सोडतीतील घरांचे वितरण करण्यासाठी आतापर्यंत कोकण मंडळात पणन (मार्केटिंग) विभागच नव्हता. आता जवळपास सहा हजार घरांच्या वितरणाची जबाबदारी आल्याने कोकण मंडळांचा स्वतंत्र मार्केटिंग विभाग मुख्यालयातील पहिल्या मजल्यावर सुरू करण्यात येणार आहे. या विभागात 15 कर्मचारी आणि तीन मिळकत व्यवस्थापक असतील. 
चार कोटींचा फायदा : म्हाडाने प्रत्येक अर्जाबरोबर प्रक्रिया शुल्क म्हणून 300 रुपये घेतले होते. ही एकत्रित रक्कम चार कोटी दोन लाख 37 हजार 200 रुपये आहे. ती म्हाडाच्या तिजोरीत जमा होणार आहे.