Breaking News

पुढील पाच वर्षात 1 हजार मेगावॅट विजेची बचत शक्य : बावनकुळे

सातारा, 22 -  नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा स्त्रोतांचा वापर करुन सौर उर्जा निर्मितीला प्राधान्य देण्याबरोबरच राज्य शासनाने ऊर्जा बचत व संवर्धनासाठी ’राज्य ऊर्जा संवर्धन धोरण’ तयार केले आहे. या धोरणाच्या अंमलबजावणीमुळे पुढील पाच वर्षात एक हजार मेगावॉट विजेची संभाव्य बचत शक्य आहे, अशी माहिती उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली.
दरम्यान, ऊर्जा बचत व व्यवस्थापनामध्ये सहकारी साखर उद्योगात राज्यात दुसरे स्थान पटकाविलेल्या किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्यास स्मृतिचिन्ह व प्रशस्तिपत्रक देऊन मंत्री बावनकुळे यांच्या हस्ते सन्मानिक करण्यात आले. कारखान्याचे उपाध्यक्ष गजानन बाबर, संचालक नंदकुमार निकम, प्रभारी कार्यकारी संचालक एन. बी. पाटील व कोजन इनचार्ज डी. आर. वाघोले यांनी हा सन्मान स्वीकारला. ऊर्जा बचत आणि व्यवस्थापनामध्ये उत्कृष्ट काम करुन प्रथम तीन क्रमांकात आलेल्या राज्यातील सहकारी साखर कारखान्यांसह अ‍ॅटोमोबाईल, मेटल अॅण्ड स्टील, इंजिनिअरिंग, टनेसटाईल, व्यापारी व निवासी इमारती आदी 174 संस्था व व्यक्तींना महाराष्ट्र उर्जा विकास अभिकरण (मेडा) अर्थात ’महाऊर्जा’ मार्फत ऊर्जामंत्री बावनकुळे, शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर व मान्यवरांच्या हस्ते पुण्यातील कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. आमदार माधुरी मिसाळ, महाऊर्जाचे महासंचालक नितीन गद्रे पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष डॉ. सतीशचंद्र जोशी, भीमराव तापकीर उपस्थित होते.
भविष्यातील वाढत्या विजेची मागणी भागविण्यासाठी नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा स्त्रोतांचा शोध व विजेची बचत गरजेची आहे. या क्षेत्रातील संशोधन करण्यावर राज्य-केंद्र शासनाने लक्ष केंद्रित केले पाहिजे असे डॉ. काकोडकर यांनी नमूद केले. कार्यक्रमात नितीन गद्रे यांनी प्रास्ताविक केले. अभिजित कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. महाऊर्जाचे वरिष्ठ महाव्यवस्थापक उमाकांत पांडे यांनी आभार मानले.