Breaking News

भविष्यात पत्रकारीतेचे माध्यम बदललेले असेल ः आ. चव्हाण

कराड, 22 - इंटरनेट, मोबाईलच्या माध्यमातून जगातील घडामोडींची माहिती क्षणात उपलब्ध होत असून पत्रकारितेचे स्वरूप झपाट्याने बदलायला लागले आहे. शब्द राहतील, मात्र ते छापील असण्याची शंका आहे. मल्टीमिडियामुळे पत्रकारितेचे संदर्भ बदलत चालले असून येत्या पाच ते दहा वर्षांत पत्रकारितेचे माध्यम बदललेले असेल, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
येथील छत्रपती संभाजी भाजी मार्केटमध्ये सुमारे 50 लाख रुपये खर्चून बांधण्यात येणार्‍या पत्रकार भवनच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. यासाठी मुख्यमंत्री असताना चव्हाण यांनी निधी मंजूर केला होता. नगरपालिकेने यासाठी संभाजी भाजी मार्केटमधील 2500 चौरस मीटर जागा दिली आहे. आमदार बाळासाहेब पाटील, आमदार आनंदराव पाटील, नगराध्यक्षा सौ. संगीता देसाई, उपनगराध्यक्ष सुभाषराव पाटील, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव, माजी नगराध्यक्ष जयवंतराव पाटील, बांधकाम सभापती हणमंत पवार, विरोधी पक्षनेत्या सौ. स्मिता हुलवान यांची प्रमुख उपस्थिती होती.कराडमध्ये होणारे पत्रकार भवन शहराच्या वैभवात भर टाकणारे होणार असून या सुविधेचा पत्रकारांसह लोकप्रतिनिधींना चांगला उपयोग होईल, असा 
विश्‍वास व्यक्त करून चव्हाण पुढे म्हणाले, इंटरनेट, मोबाईलमुळे पत्रकारितेचे स्वरूप बदलायला लागले आहे. नवीन पिढीला वृत्तपत्रांचे आकर्षण राहिलेले नाही. इंटरनेट, मोबाईलवरील बातम्यांवर प्रत्येक क्षणाला माहिती अपडेट होत असते. त्यामुळे येत्या 5 ते 10 वर्षांत दैनिके राहतील की नाही, याची शंका वाटते. आज वृत्तपत्रे मोबाईलवर वाचता येतात. त्यातही मल्टीमिडियामुळे व्हीडोओ, फोटो, शब्द याच्या सीमा संपल्या असून संगणक साक्षर असणार्‍या पत्रकारांनी यात येणार्‍या नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याची गरज आहे. 
लोकप्रतिनिधी आणि पत्रकारांचे विशिष्ट असे नाते आहे. लोकप्रतिनिधींची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी पत्रकारितेशिवाय अन्य माध्यम नाही. पत्रकार ही संकल्पना मोठ्या शहरांमध्ये बदलत चालली असून त्याचे पारंपरिक स्वरूपही लोप पावत चालले आहे. त्यातच या क्षेत्रात येणारी नवी पिढी स्पर्धा करणारी असल्याने आजच्या पत्रकारांनी सेल्फ डेव्हलपमेंटबरोबर आपल्या पत्रकारितेचा दर्जा वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले. भविष्यात पत्रकार भवन एसी करावे, अशी सूचनाही मांडली.
आमदार बाळासाहेब पाटील म्हणाले, लोकशाहीचा चौथास्तंभ म्हणून पत्रकारितेकडे पाहिले जाते. कराडच्या पत्रकारितेला मोठी परंपरा असून आता तरूण मंडळी या क्षेत्रात सक्रीय आहेत. ब्रेकींग न्यूजचा जमाना असला तरी छापील मजकुरावर लोक जास्त विश्‍वास ठेवतात. पत्रकार भवन ही मोठ्या शहरांत असणारी संकल्पना येथे तालुकास्तरावर होत आहे. या माध्यमातून शहर व परिसराचे प्रश्‍न सोडवण्यास मदत होईल.आ. आनंदराव पाटील म्हणाले, मुख्यमंत्री असताना पृथ्वीराजबाबांनी पत्रकार भवनसाठी निधी दिला. राजकारण बाजूला ठेवून मिळालेल्या संधीचा उपयोग या भागाच्या विकासासाठी करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. यापुढील काळात राजकारणाचा विचार न करता कराडच्या विकासासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत. राजेंद्रसिंह यादव म्हणाले, कराडमधील पत्रकारांचे स्वप्न साकार होत असल्याचा आनंद आहे. गोपाळ गणेश आगरकरांचा वारसा येथील पत्रकारिता जपत आहे. पत्रकार भवनच्या माध्यमातून येथील पत्रकारितेला लोकाश्रय मिळत आहे. तसेच सुसंवाद निर्माण होईल.
नगराध्यक्षा संगीता देसाई यांनी पत्रकार भवन लवकरात लवकर पूर्ण करण्यात येणार असून यातील सुविधांची माहिती दिली. प्रारंभी पत्रकार भवनसाठी सहकार्य केल्याबद्दल तीनही आमदार व पालिका पदाधिकार्‍यांचा सत्कार सत्कार करण्यात आला. सुहास इनामदार यांनी सूत्रसंचालन केले. मोहसीन आंबेकरी यांनी आभार मानले. कार्यक्रमास शहर व तालुक्यातील पत्रकार, आजी माजी नगरसेवक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.