नेताजींचे पणतू चंद्र बोस यांचा भाजपमध्ये प्रवेश
कोलकाता, 25 - नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे पणतू चंद्र बोस यांनी सोमवारी भाजपमध्ये प्रवेश केला. पश्चिम बंगालमध्ये यावर्षी विधानसभा निवडणुका होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर या घडामोडीने सर्वांचे लक्ष वेधले आहे. भाजप ही एक नॅशनल पार्टी आहे आणि पक्षासोबत काम करून आनंद होईल, असे ते म्हणाले.
चंद्र बोस यांची सोमवारी दुपारी हावडा येथील गेस्ट हाऊसवर भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्याबरोबर सिक्रेट मिटींग झाली. या मिटींगमध्ये चंद्र यांच्या भाजपप्रवेशावर शिक्कामोर्तब झाले. शाह यांची सोमवारी हावडामध्ये महत्त्वाची रॅली आहे. या रॅलीमध्ये चंद्र भाजपमध्ये सहभागी होतील. भाजपने मात्र याबाबत अद्याप काहीही अधिकृतरित्या सांगितलेले नाही. चंद्र यांची नेताजींच्या फायली सार्वजनिक करण्यामागे महत्त्वाची भूमिका आहे.
त्यांना नरेंद्र मोदींचे नीकटवर्तीय म्हणूनही ओळखले जाते. पश्चिम बंगालमध्ये भाजपकडेही राज्य स्तरावर मोठा चेहरा नाही. त्यामुळे चंद्र बोस पक्षासाठी महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. मोदींनी शनिवारीच नेताजींशी संबंधित 100 फायली सार्वजनिक केल्या होत्या. त्यावेळी चंद्र बोसही उपस्थित होते.