शहीद संतोष महाडिक यांचा मरणोत्तर शौर्य चक्र पुरस्काराने गौरव
नवी दिल्ली, 25 - अतिरेक्यांसोबत झालेल्या चकमकीत वीरमरण आलेल्या कर्नल संतोष महाडिक यांना मरणोत्तर शौर्य चक्र पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. केंद्र सरकारने आजच पद्म पुरस्कार विजेत्यांची नावं जाहीर केली. त्यासोबतच शहीद संतोष महाडिक यांनाही मरणोत्तर शौर्य चक्र बहाल करण्याचा निर्णय सरकारने घेतला.
यापूर्वी अतिरेक्यांशी झालेल्या यशस्वी चकमकीमुळे त्यांचा ‘सेना मेडल’ देऊन गौरव करण्यात आला होता. अतिरेक्यांविरोधात 13 नोव्हेंबरपासून आॅपरेशन सुरु होतं. मात्र अतिरेक्यांच्या गोळीबारात जखमी झालेल्या महाडिक यांची प्राणज्योत मालवली. जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जंगलात 17 नोव्हेंबर 2015 रोजी जवान आणि अतिरेक्यांच्या झालेल्या चकमकीत कर्नल संतोष महाडिक शहीद झाले आहेत. स्पेशल फोर्सचे कमांडो आणि 41 राष्ट्रीय रायफल्सचे कमांडिग ऑफिसर महाडिक यांना वीरमरण आलं. महाडिक हे सातारा जिल्ह्यातील पोगरवाडी गावचे रहिवाशी होते, मात्र त्यांचं कुटुंब सध्या उधमपूरमध्ये वास्तव्यास होतं. त्यांना 5 आणि 11 वर्षांची दोन अपत्य आहेत.