फ्रान्सकडून 36 राफेल लढाऊ विमाने खरेदी करण्याचा करार
दिल्ली, दि. 26 - फ्रान्सकडून 36 राफेल लढाऊ विमाने खरेदी करण्याच्या कराराची औपचारिकता सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वाक्षरीने पूर्ण झाली. फ्रान्सचे अध्यक्ष फ्रान्स्वॉ ओलांद हे प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला हजर राहण्यासाठी भारत भेटीवर आले आहेत.
ओलांद यांच्या तीन दिवसीय दौर्यात आज मोदींसोबत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत लढाऊ विमाने खरेदी करण्याच्या करारावर स्वाक्षर्या झाल्या. फ्रान्सकडून 36 राफेल लढाऊ विमाने खरेदी करण्याचा करार हा द्विपक्षीय संबंध सुधारण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल. याशिवाय हा करार दोन्ही देशांतील विश्वासाचे प्रतिक ठरणारा आहे, असे नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.
या करारानंतर तीन वर्षांत पहिले लढाऊ विमान भारताला पुरविण्यात येणार असल्याचे मसुद्यात म्हटले आहे, तर पुढील सात वर्षांत भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात 36 लढाऊ विमाने दाखल केली जातील. सध्या उपलब्ध असलेली लढाऊ विमाने पाकिस्तान आणि चीनचा सामना करण्यासाठी पुरेशी नाहीत, त्यासाठी किमान 44 विमानांची गरज आहे. त्यामुळे सदर 36 विमाने मिळाल्यावर हवाई दलाचे सामर्थ्य वाढणार आहे.