Breaking News

चिले महाराजांच्या रथ सोहळ्याची सांगता

फलटण, 31 -  पायी हळुहळू चाला मुखाने दत्त चिले बोला, आम्ही भाग्यवान आनंद निधान, निघालो घेऊन पालखी चिले दत्तांची असा दत्त नामाचा जयघोष करत टाळ मृदुंगाच्या गजरात भगव्या पताका खांद्यावर घेतलेल्या हजारो भक्तांच्या अलोट भक्तीसागरामध्ये चिले महाराज यांच्या रथ सोहळ्याची सांगता झाली. श्री क्षेत्र मोर्वे (ता. खंडाळा) येथे चिले महाराज यांचा आगमन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
श्री सदगुरु चिले महाराज यांनी 26 जानेवारी, 1985 रोजी मोर्वे गावात पहिले पाऊल ठेवले होते. तेव्हापासून तो दिवस भाग्यवान दिन म्हणून भक्तगण साजरा करत असतात. त्यानिमित्ताने 15 जानेवारी रोजी श्री क्षेत्र जेऊर (पैजारवाडी) येथून रथ सोहळ्याचे प्रस्थान होऊन 26 जानेवारी रोजी हा रथ सोहळा मोर्वे येथे येवून तेथे मिरवणूक काढली. मिरवणुकीमध्ये घोडे, बॅण्ड, झांजपथक ताफ्यासह आकर्षक फुलांनी सजवलेल्या रथामध्ये श्रींचा देव्हारा, चिले महाराजांच्या पादुका पालखीसह ठेवली होती. आरतीनंतर विविध भक्त, भजनी मंडळासह भव्य मिरवणूक काढण्यात आली. अहिरे ते मोर्वे या 2 कि. मी. अंतरावर विविध संस्था व ग्रामस्थांनी पालखीचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले. पालखी सोहळा दत्त मंदिरामध्ये आल्यावर भजन व आरती झाल्यानंतर भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आला. जेऊर (पैजारवाडी) कोल्हापूर, पुणे, सोलापूर, रत्नागिरी येथील हजारो भक्त या सोहळ्यात सहभागी झाले होते. यानिमित्त ढोल-लेझीम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.