Breaking News

शौचालय बांधणीबाबत सातारा पालिकेकडून नोटीसा

सातारा, 31 -  केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत प्रत्येक घरी शौचालय ही संकल्पना राबवत केंद्र आणि राज्य सरकार आणि स्थनिक स्वराज्य संस्था यांच्याकडून नागरिकांना शौचालय बांधण्यासाठी अनुदान मिळत आहे. मात्र, 6 हजार रुपयांचा पहिला हप्ता मिळूनही शौचालय बांधणीस सुरुवात न करणार्‍या 110 लोकांना सातारा नगरपालिकेने नोटिसा बजावल्या आहेत. 
लवकरात लवकर शौचालयाच्या बांधकामास सुरुवात करावी अन्यथा दिलेला हफ्ता परत घेण्यात येईल, असा इशारा आरोग्य विभागाच्यावतीने देण्यात आला आहे.
स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहरी हद्दीत ज्या नागरिकांकडे शौचालय नाही अशा लोकांना शौचालय बांधणीसाठी सरकार व नगरपालिकेकडून एकूण 17 हजार रुपयांचे अनुदान देण्यात येते. सातार्‍यातही शौचालय बांधणीसाठी मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल करण्यात आले होते. अनुदानामध्ये केंद्र आणि राज्य सरकार प्रत्येकी 6 हजार व नगरपालिका 5 हजार रुपये असे एकूण 17 हजार रुपये देण्यात येणार आहेत. नागरिकांना तीन टप्प्यात हे अनुदान मिळणार आहे. यामधील पहिल्या टप्प्यातील 6 हजार रुपयांचा हफ्ता देण्यात आला आहे. 
हफ्ता मिळाल्यानंतर शौचालय मंजूर झालेल्या एकूण 110 लोकांनी शौचालय बांधणीस सुरुवात केली नाही. यासाठी नगरपालिकेने सर्वसाधारण सभेत ठराव करुन ज्यांनी अनुदान मिळूनही शौचालय बांधले नाही अशा लोकांकडून अनुदान परत घ्यावे असा निर्णय झाला होता. यावर आरोग्यच्या बैठकीत अंतिम निर्णय झाल्यानंतर कारवाई सुरु करण्यात आली आहे. 
दरम्यान, नगरपालिकेने 6 हजार रुपये दिले असले तरी बांधकामासाठी 20 हजार रुपये लागतात आमची आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याने बांधकाम करता येत नाही. त्यामुळे नगरपालिकेने यासाठी वेळ वाढवून द्यावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
मुख्याधिकार्‍यांनी ही मागणी मान्य केली आहे. तसेच काही प्रकरणे जागेअभावी अडकल्यामुळे नागरिकांना विलंब होत असल्याचे निदर्शनास आले आहे. लवकरात लवकर शौचालय बांधणीस सुरुवात करावी, असे आवाहन आरोग्य विभागाच्या अधिकार्‍यांनी केले आहे.