कच्च्या तेलाच्या घसरणीमुळे मुंबईतील विकासकामांना ब्रेक?
मुंबई, प्रतिनिधी, दि. 25 - आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती घसरल्यामुळे मुंबईच्या विकासावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. कच्च्या तेलाच्या किमती घटल्यामुळे महापालिकेच्या उत्पन्नात 623 कोटींहून अधिक घट झाली आहे. आर्थिक वर्ष संपेपर्यंत हा तोटा 800 कोटींवर जाण्याची शक्यता आहे.
मुंबई महापालिकेला जकातीतून सर्वाधिक उत्पन्न मिळते. महापालिकेच्या महसुलात जकातीचा वाटा 30 टक्क्यांहून अधिक असतो. जकातीच्या उत्पन्नात कच्च्या तेलाचा वाटा 30 ते 35 टक्के असतो. यंदा आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत प्रचंड घसरण झाल्याचा फटका महापालिकेच्या उत्पन्नाला बसला झाला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत महापालिकेच्या उत्पन्नात 623 कोटी 91 लाखांची घट झाली आहे. महापालिकेने 2015-16 या आर्थिक वर्षात जकातीतून सात हजार 900 कोटी उत्पन्न मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. कच्च्या तेलातून मिळणारे उत्पन्न घटल्याने हे उद्दिष्ट कठीण झाले आहे, असे एका अधिकार्याने सांगितले. जकातीतून मिळणार्या उत्पन्नाचा मोठा वाटा मुंबईतील विकासकामांवर खर्च होतो. हे उत्पन्न घटल्यामुळे विकासकामांना फटका बसू शकतो. जकातीतून मिळणार्या उत्पन्नात 800 कोटीपर्यंत घट होईल, असा अंदाज आहे. तसे झाल्यास मोठ्या प्रकल्पांची रखडपट्टी होण्याची शक्यता वर्तवली जाते.
उत्पन्नात 400 कोटींची तूट महापालिकेच्या जकातीच्या उत्पन्नात दरवर्षी 10 ते 20 टक्के वाढ अपेक्षित असते. त्यानुसार खर्चाचे नियोजन केले जाते. मागील वर्षी जानेवारीत जकातीतून महापालिकेला पाच हजार 396 कोटी उत्पन्न मिळाले होते; या वर्षी ते चार हजार 993 कोटींवर आले आहे. यंदा उत्पन्नात अपेक्षित वाढ झाली नसून 400 कोटींहून अधिक तूट झाल्याचे समजते.